कर्नाटकचा किंगमेकर : डी.के. शिवकुमार

कर्नाटकचा किंगमेकर : डी.के. शिवकुमार

बंगळुरू : कर्नाटकमधील सत्तानाट्यात एकीकडे सर्वोच्च न्यायालयातील लढाई अभिषेक मनू संघवी यांनी अत्यंत चपळाईने आणि आपल्या वकिली कौशल्याचा वापर करत जिंकली तर दुसरीकडे कर्नाटकमधल्या आमदारांना एकत्र ठेवण्यात आणि त्यांच्यातील एकही आमदार फुटणार नाही याची काळजी घेऊन सत्तानाट्यातला नंबरगेम जिंकला तो एका माणसानं म्हणजेच आमदार व माजी मंत्री डी.के. शिवकुमार यांनी. केवळ आणि केवळ याच नेत्यांमुळे भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची कूटनीती असफल ठरली. 

कर्नाटकमधील कॉंग्रेसच्या आमदारांना बंगळुरबाहेरील एका रिसॉर्टमध्ये हलवून त्यांना पुन्हा विधानसभेत आणण्याचे काम शिवकुमार यांनी परफेक्‍ट केले. पक्षाच्या ज्या आमदारांबद्दल शंका होती त्यांच्यांवर त्यांनी कार्यकर्त्यांची करडी नजर ठेवून त्यांना त्यांनी फुटू दिले नाही. जे दोन आमदार बेपत्ता होते, तो दोन्ही आमदार मतदानाच्यादिवशी विधानभवनात आल्यावर त्यांना आपल्याबरोबर त्यांनी सभागृहात आणले आणि त्यांच्याकडे पक्षाचा व्हीप सोपवला. त्या दोघांना त्यांनी पक्षातून बाहेर जाण्यापासून परावृत्त केले. शिवकुमार यांची ही दणदणीत कामगिरी प्रथमच झालेली नाही. गुजरातमध्ये मागील राज्यसभा निवडणुकीत अहमद पटेल यांना निवडून देताना तेथील कॉंग्रेसच्या आमदारांना त्यांनीच असे एकत्र ठेवून कर्नाटकमध्ये आणले होते. 

कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात शिवकुमार यांनी उर्जामंत्रीपद सांभाळले होते. यावेळच्या सत्तानाट्यात नियतीचा न्यायच असा झाला की वक्कलिंग समाजात ज्यांचे खंबीर नेतृत्व मानले जाते त्या एच. डी. देवेगौडा यांना दुसऱ्या वक्कलिंग नेत्याची म्हणजेच शिवकुमार यांची जबरदस्त साथ लाभली. देवेगौडा आणि शिवकुमार यांच्यातले आजचे हे मैत्र केवळ भाजपविरोध याच एका दुव्यावर निर्माण झाले आहे. त्यांच्यातील आजचे हे सख्य ही गमतीशीरच बाब आहे. कारण ज्या कुमारस्वामी यांच्या सरकार स्थापनेसाठी त्यांनी हे सारे काही केले त्याच कुमारस्वामी यांचा त्यांनी 1999 मध्ये सथनूर विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता. दुसरी मजेशीर बाब म्हणजे त्यांना माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याकडून याच मतदारसंघात 1985 मध्ये पराभव पत्करावा लागला होता. शिवकुमार यांची ती पहिलीच निवडणूक होती. मात्र देवेगौडा यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यांनी जागेचा राजीनामा दिला आणि पोटनिवडणुकीत मात्र शिवकुमार यांचा विजय झाला. पुढे त्यांनी देवेगौडा यांच्याविरुद्ध लोकसभेचीही निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा त्यात पराभव झाला होता. 

सातवेळा आमदार असलेल्या शिवकुमार यांनी 2013 च्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत कनकपुरा मतदारसंघातून लाखांच्या फरकाने विजय मिळवला आणि मंत्रीही झाले. शिवकुमार यांची दुसरी ओळख म्हणजे ते देशातले ते अत्यंत श्रीमंत राजकारणी आहेत. त्यांची आणि त्यांच्या पत्नीची घोषित संपत्ती 730 कोटी रुपये आहे तर त्यांच्या मुलीच्या नावावरही शंभर कोटीपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यांच्या खाणी आहेत तसेच त्यांचे भाऊ डी सुरेश हे खासदार आहेत. या दोन्ही भावांवर जमीन हडप केल्याचे आणि खाणीसंदर्भात चुकीच्या बाबी केल्याचेही आरोप आहेत. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात शिवकुमार यांच्या उद्योगाशी संबंधित घटनांमुळे आयकर विभागाने त्यांच्या दिल्ली आणि कर्नाटकमधील कार्यालयावर एकाचवेळी धाडी घालून काही बेहिशोबी मालमत्ता जप्त केली होती. तसेच अटकही केली होती, नंतर त्यांना त्या प्रकरणातून जामीनही मिळाला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com