Khot will not meet Amit Shaha as our represetetive: Shetty | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून सदाभाऊ हे  अमित शहा यांना भेटू शकत नाही : शेट्टी 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 जून 2017

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दुसरा कोणी नेता अमित शहा यांना भेटणार नाही, असे सांगून सदाभाऊ खोत यांनाही राजू शेट्टी यांनी इशारा दिला आहे

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे भाजप अध्यक्ष अमित शहा यांना भेटू शकत नाही,'' अशी भूमिका संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी घेतली आहे. 

अमित शहा हे राज्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असून मुंबईत सर्वांच्या भेटीगाठी घेत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष असलेल्या नेत्यांनाही ते भटणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मात्र बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. शेट्टी यांच्याऐवजी खोत हे शहा यांची भेट घेणार असल्याचे आधी बोलले जात होते. भाजपनेही खोत यांनाच निमंत्रण दिल्याची चर्चा होती.
 
या उलट शेट्टी यांनी दिल्लीत जाऊन मोदी सरकार विरोधी आंदोलनाची भाषा केली आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दुसरा कोणी नेता अमित शहा यांना भेटणार नाही, असे सांगून सदाभाऊ खोत यांनाही राजू शेट्टी यांनी इशारा दिला आहे. या संदर्भात शेट्टी यांनी एका खासगी वाहिनीला मुलाखत दिली. 

ते म्हणाले, "माझ्या पक्षाचा मी प्रमुख आहे, माझ्या गैरहजेरीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दुसरे कोणी भेटणार नाही. अमित शहांच्या बैठकीसाठी मला भाजपकडून फोन आला होता. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यासाठी फोन केला होता. माझ्यासाठी दिल्लीतील शेतकऱ्यांची बैठक महत्त्वाची आहे. त्यामुळे मी शहा यांना भेटणार नाही.'' 

राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात त्यांनी शिवेसनेशी जवळीक साधली आहे. ते म्हणाले, "जो चांगला उमेदवार देईल त्यांना आमचा पाठिंबा राहिल. शिवसेनेने दिलेल्या नावाला पाठिंबा राहील. शिवसेनेने एम. एस. स्वामिनाथन यांचे नाव सुचविले आहे. स्वमिनाथन यांनी शेतक-यांच्या भल्यासाठी काम केले आहे. त्यामुळे त्या नावाला विरोध करण्याचे कारण नाही.'' 

शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, स्वामिनाथन समितीच्या शिफारसी लागू कराव्या असा दोन मागण्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर आंदोलन करण्याबाबत दिल्लीत शेतकरी संघटनांची एकत्रित बैठक सुरू आहे. रामपाल जाट (राजस्थान), उड्डीआळी चंद्रशेखर (कर्नाटक), व्ही एम सिंग (युपी), योगेंद्र यादव (दिल्ली) आदी शेतकरी नेते यात उपस्थित आहेत.

संबंधित लेख