Khot appa : who serves masuchiwadi for 32 years | Sarkarnama

खोत आप्पा : मसूचीवाडी गावासाठी ३२ वर्षे झटणारे अवलिया सरपंच

संपत मोरे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

सरपंच म्हटलं की सध्याच्या काळाच वेगळीच प्रतिमा येते. पण मसूचीवाडी येथील खोत अाप्पा यांचे हे व्यक्तिचित्र वाचल्यानंतर खरा सरपंच कशाला म्हणायचे हे कळते. आप्पांनी आपल्या गावाला जपले आणि गावानेही त्यांच्यावर मनापासून प्रेम केले.

दत्तू रत्तू खोत यांना सगळे लोक आप्पा म्हणतात. सांगली जिल्हातील वाळवा तालुक्यातील मसूचीवाडी गावचे हे माजी सरपंच.आप्पा इस्लामपूरला किंवा सांगलीला काही कामाच्या निमित्तानं गेले तरी त्यांना ओळखणारे लोक भेटतात, त्यामुळे आप्पांच्या सोबत असलेल्या माणसाला आप्पा आणि तो त्यांना भेटलेला माणूस यांच्या रसाळ गप्पा ऐकण्याची वेळ येते. ज्यांची तालुक्याला आणि जिल्ह्याला ओळख आहे असे आप्पा आहेत तरी कोण? लोक त्यांना का ओळखतात?

आप्पा मसूचीवाडी या गावचे १९६८ ते २००२ असे सलग ३२ वर्षे सरपंच होते. या सरपंचकीच्या काळात आप्पांनी गावासाठी खूप काही केलं. अगदी गावाला रस्ता नव्हता तर झाडाझुडुपातून पाऊलवाट होती. आप्पांनी स्वतः हातात कुऱ्हाड घेतली, झाडंझुडपं तोडायला लागले. लोकांच्या मदतीनं रस्ता केला. गावाला एसटी आणली. एसटी नव्हती तेव्हा जवळच्या  बोरगाव गावापर्यंत लोकांना चालत जावं लागायचं. पण आप्पांनी गावात एसटी आणली. ज्यादिवशी गावात पहिल्यांदा एसटी आली होती तेव्हा गावातील लोकांना ती गोष्ट पटत नव्हती. आश्चर्य वाटत होते.

रुग्णसेवेचा आदर्श

गावात जेव्हा एसटी नव्हती तेव्हा गावात कोणीही आजारी पडलं तरी आप्पा त्या आजारी माणसाला  खांद्यावरून घेऊन बोरगावपर्यंत जायचे. आजारी माणूस हा आप्पांचा विक पॉईंट! .त्याचं कारणही तसंच. आप्पांच्या वडिलांना आजारी असताना वेळेत उपचार मिळाले नाहीत म्हणून ते वारले. याचं नेहमी आप्पाना शल्य वाटत राहीलं. त्यामुळं आजारी माणूस बघितला कि त्यांना दया यायची. ते लगेच आजारी माणसाला दवाखान्यात घेऊन जायचे . अनेक आजारी लोकांनी आप्पांच्या खांद्यावरून बोरगावपर्यंत  प्रवास केला आहे. सेवाभाव अंगी मुरलेल्या आप्पाना गावातील लोकांनी सरपंच केले आणि मग त्यानंतर सलग ३२ वर्षे त्याना या पदावर काम करण्याची संधी मिळाली. 

पोस्ट आणि पत्रही

सरपंच झाल्यानंतर त्यांनी गावात अनेक विकासकामे केली.गावातलं हायस्कूल, पिण्याचं पाणी, टेलिफोन ऑफिस ही त्यांची ठळक कामं. हि विकासकामे करत असताना आप्पानी अनेक अभिनव गोष्टीचा अवलंब केला. उदाहरणच द्यायचं झालं तरी गावात पोस्ट सुरु झालं मग लोकांना पत्रें पाठवायची सवय व्हावी म्हणून आप्पांनी गावात प्रत्येक घरात मोफत पोस्टकार्ड वाटलीच. पण त्यांनी पत्रे लिहायची कशी, हे देखील शिकवलं. त्यांच्याकडून त्यांच्या पाहुण्यांना पत्रे लिहून घेतली. मसूचीवाडी गावातून एकाचवेळी पैपाहुण्याना पत्रे गेली. गावातील लोकांच्या नावांनी गावात उलट टपाली उत्तरे येऊ लागली. आलेले पत्र घेऊन पोस्टमन दारात जाऊ लागला तेव्हा लोकांना आनंद व्हायचा. आज आप्पांच्या गावात घरटी दोन दोन मोबाईल आहेत. पण त्याकाळात गावातून पत्र जाणं आणि येणं हीच मोठी गोष्ट होती. 

गावचे कुटुंबप्रमुख

दत्तू आप्पा यांनी गावचे सरपंचपद भूषवताना गावाशी एक नातं तयार केलं, गावचा कुटुंबप्रमुख म्हणूनच ते वावरले. गावातील लोकांच्या सुखदुःखात ते नेहमीच सहभागी झाले. गावचे सरपंच असूनही पुढारपण कधीही त्यांच्या डोक्यात गेलं नाही. ते कायम कार्यकर्त्याच्या भूमिकेत राहिले. एकादं लग्न असेल तर स्वतः अक्षता वाटतील, पंक्तीत वाढतील. कोणाला काम सांगायचं नाही. अगोदर आपणच कामाला सुरुवात करायची मग आप्पा कामाला लागले हे पाहून इतर तरुण पोरही कामाला लागायची. अनेक ठिकाणी हा प्रसंग घडायचा. 

गावासाठी आप्पांनी खूप वेळ दिला. सकाळ झाली की आप्पांचा दिवस सुरु व्हायचा. गावातील माणसं काम घेऊन यायची. कोणाचं तहसीलदार कचेरीत काम असायचं तर कोणाच्या पोरीला सासरची लोक त्रास देतात म्हणून तो बाप काळजीनं आलेला असायचा. दोन माणसं पुढं आलेली असायची मग आप्पांच्यापुढं दोन माणसं असली तर आप्पा त्यातील कामाला बरोबर प्राधान्य द्यायचे, ज्याचं काम तहसीलदार कचेरीत असेल त्याला सांगायचे ,"तू दुपारपर्यंत तिथं ये. मी त्या पोरीचं काय झालंय बघून येतो. आप्पानी आजवरच्या आयुष्यात सगळा वेळ गावासाठी दिला आहे. आप्पा ज्यावेळी गावाची सेवा करत होते तेव्हा त्यांचा संसार त्याचे भाऊ सदाशिव यांनी सावरला.'भावान आमचा संसार केला तर मी गावाचा संसार केला."असं आप्पा सांगतात.

गावानेही केले प्रेम

ज्या आप्पानी गावासाठी एवढं केलं त्याच्यावर गावानेही प्रेम केलं, आप्पा मोटरसायकलवरून प्रवास करतात. त्यांना त्रास होऊ नये म्हणून गावातील लोकांनी वर्गणी काढून एक जीपगाडी घेऊन दिली. खरतर एकाद्या सरपंचाला गावाने वर्गणी काढून जीपगाडी घेऊन देण्याची अशी एकमेव घटना असावी.

८४ वर्षांचे आप्पा आता थकले आहेत. सक्रिय राजकारणापासून दूर आहेत पण त्याची गावाशी असणारी नाळ तुटलेली नाही. आजही त्याच्याकडे लोक येतात आणि त्यांच्याकडे गाऱ्हाणी मांडतात. आप्पा जसं जमेल तसं मदत करतात..आप्पा वयाने म्हातारे झाले आहेत. पण त्यांची कार्यकर्ता वृत्ती अजून तरुण आहे. त्याच्या बळावर आप्पा अजूनही लोकांच्या सेवेत कार्यरत आहेत. "लोकांनी जो जीव लावला आहे त्यातून उतराई होण्यासाठी प्रयत्न करतोय. लोक ताकदवान असतात आपण निमित्त असतो, असं विनम्रपणे आप्पा सांगतात.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख