khed-election | Sarkarnama

खेड-आळंदी विधानसभेला कोण ठरणार बाजीगर? 

हरिदास कड 
शनिवार, 3 मार्च 2018

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात कोण बाजीगर ठरणार याची चर्चा आताच रंगली आहे. येथे इच्छुकांची मांदियाळी आहे. विद्यमान शिवसेना आमदार सुरेश गोरे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे माजी आमदार दिलीप मोहीते, बाबा राक्षे व इतर इच्छुक आहेत. 

चाकणः खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात कोण बाजीगर ठरणार याची चर्चा आताच रंगली आहे. येथे इच्छुकांची मांदियाळी आहे. विद्यमान शिवसेना आमदार सुरेश गोरे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे माजी आमदार दिलीप मोहीते, बाबा राक्षे व इतर इच्छुक आहेत. 

आमदार गोरे यांची उमेदवारी पक्की आहे. भाजपकडून अतुल देशमुख आणि शरद बुटेपाटील यांची नावे घेतली जात आहेत. मात्र, कुठल्याचे पक्षाचा उमेदवार नक्की नसून त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरु असल्याने सर्व इच्छूक संभ्रमावस्थेत आहेत. ऐनवेळी येथे पक्षांतर वा बंडखोरीची होईल, असे लक्षणे आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस यावेळी उमेदवारी बदलणार की नव्या उमेदवाराला संधी देणार याचीही चर्चा जोरात सुरू आहे. माजी आमदार मोहिते मात्र मीच उमेदवार आहे असे सांगत आहेत. दुसरीकडे "राष्ट्रवादी'चे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ऊर्फ बाबा राक्षे "मी उमेदवार आहे. मला उमेदवारी मिळणार आहे' असे सांगत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवारी तळ्यात-मळ्यात आहे. भाजपकडून जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टेपाटील; तसेच आयाराम, गयारामाला ही उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे खरी लढत शिवसेना, राष्ट्रवादी या दोनच पक्षात होणार आहे. 

खेड तालुक्‍यात शिवसेनेचा पहिल्यांदा आमदार होण्याचा मान आमदार सुरेश गोरे यांना मिळाला. त्यांनी खेड तालुक्‍यात चार वर्षांच्या काळात त्यांच्या मते कोट्यावधी रूपयांची विकासकामे केली. पण कामे करत असताना ती प्रत्यक्षात किती आली? किती जनतेला फायदा झाला? कोण कार्यकर्ते खुष झाले, कोण रूसले ? यावर त्यांच्या निवडणुकीची गणिते अवलंबून आहेत. त्यांचा दबदबा तालुक्‍यात किती आहे यावर त्यांच्या यशाचे गमक अवलंबून राहणार आहे. 

आमदार गोरे हे खरे राष्ट्रवादीचे. पण त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली आणि माजी आमदार मोहीते यांच्या विरोधातील त्सुनामी लाट त्यांच्या फायद्याची ठरली. आमदार गोरे हे दुसऱ्यांदा निवडणूकीला सामोरे जाणार आहेत. यावेळी आमदार गोरे यांना मागच्या निवडणुकीत मदत करणारे राष्ट्रवादीचे बाबा राक्षे व इतर उमेदवारीची मागणी करत असल्याने गोरे यांना त्यांची मदत मिळणार नाही हे नक्की आहे. शिवसेनेकडे जिल्हाप्रमुख राम गावडे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. पण त्यांची मागणी प्रत्यक्षात येणार नाही. शिवसेनेने आमदार गोरे यांची उमेदवारी पक्की केली आहे हे मात्र खरे आहे. 

माजी आमदार मोहिते मात्र पराभवाचा वचपा काढण्यासाठी रिंगणात उतरणार आहेत. मोहिते यांना यश आपल्या पदरात पडेल अशी खात्री आहे. पण राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला नक्की मिळते यावर लढतीचे चित्र ठरणार आहे. सध्या बाबा राक्षे यांनी विधानसभेला कोणत्याही परिस्थितीत उभे राहायचे या दृष्टीने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. त्यांना पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांच्या कानात तुम्हाला उमेदवारी यावेळी दिली जाईल असे सांगून कामाला लागा असे सांगितले आहे. त्यामुळे बाबा राक्षे यांनी अगदी कॉंग्रेसचे अमोल पवार, भाजपचे शरद बुट्टेपाटील, राष्ट्रवादीचे डॉ. शैलेश मोहीते, हृषीकेश पवार यांच्याशी जवळीक साधून अगदी त्यांच्या सहलीचे आयोजन करून त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे माजी आमदार मोहिते यांना उमेदवारी मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. 

हृषीकेश पवार हे माजी आमदार स्वर्गीय नारायण पवार यांचे नातू आहेत. त्यांनाही पक्षाच्या वरिष्ठांनी काही शब्द दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे ते ही युवा कार्यकर्ते असल्याने विधासभेसाठी प्रयत्न करत आहेत, असे चित्र त्यांनी तयार केले आहे. खरी लढत शिवसेना, राष्ट्रवादीच्या उमेदवारांतच होणार आहे. त्यामुळे कोण बाजीगर ठरणार हे काळच सांगणार आहे. 

तालुक्‍यातील येणारी निवडणूक टिकाटिप्पणीवर न होता विशेषतः पक्षाकडून मिळणाऱ्या उमेदवारीवर होणार आहे. आमदार गोरे यांच्यावर राष्ट्रवादी व इतर पक्षाचे उमेदवार टिका करणार आहे. पण टिकाटिप्पणीपेक्षा तालुक्‍याला नवखा उमेदवार पाहीजे की तोच पुन्हा हे मतदार ठरविणार आहे. खेड तालुक्‍यात माजी सभापती रामदास ठाकूर, माजी उपसभापती राजू जवळेकर यांचा ही वेगळा दबदबा आहे. ते दोघेही कोणाला मदत करतात की उमेदवारी मागतात यावर ही बरेच काही अवलंबून आहे. ठाकूर यांनी विधासभेची निवडणूक लढविलेली आहे. त्यामुळे ते कोणासाठी काम करतात हे महत्वाचे आहे. मनसेचे अशोक खांडेभराड यांनी निवडणूक लढविली आहे. त्यामुळे ते ही विधानसभेसाठी तयारी करत आहे. त्यामुळे उमेदवारांची संख्या येत्या निवडणूकीत वाढू शकते. 
 

संबंधित लेख