खडसे नाव दिसले रे दिसले की आरोप करायचे ! 

खडसे नाव दिसले रे दिसले की आरोप करायचे ! 

मुंबई : ' भ्रष्टाचाराच्या इतर प्रकरणांमध्ये बोलायचे नाही आणि फक्त 'एकनाथ खडसे' हे नाव दिसले रे दिसले , की आरोप करायचे, अशी काहींची भूमिका असते', अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांनी केलेल्या आरोपावर उत्तर दिले. 

ते म्हणाले,  ' गैरव्यवहार केल्याचे आरोप माझ्यावर झाले.. माझ्या पीएने लाच घेतल्याचे आरोप झाले.. दाऊदशी संबंध असल्याचे आरोप झाले.. या सगळ्याची सरकारने, अँटी करप्शन विभागाने आणि लोकायुक्तांनीही चौकशी केली. पण त्यातून समोर काय आले ? शून्य ! ' 

'खडसे यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले' अशी तक्रार अंजली दमानिया यांनी पोलिसांत दाखल केली आहे. या आरोपांवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली.

ते म्हणाले, "आतापर्यंत माझ्यावर झालेल्या आरोपांची चौकशी झाली आहे. न्यायालयाने नेमलेल्या समितीचा अहवालही सादर होईल. पण माझ्यावर असे निराधार आरोप सतत होत आहेत. भोसरीमध्ये माझ्या जावयाने जागा घेतली, त्याचीही चौकशी झाली. त्यातून काहीही समोर आलेले नाही. या राज्यात कुणी जमीन घेऊच नये का? माझ्या जावयाने सर्व नियम पाळूनच जमीन घेतली आहे. या जागेचे व्हॅल्युएशन झालेले आहे, खरेदीच्या व्यवहारावर स्टॅंप ड्युटी भरलेली आहे. या जमिनीच्या कागदपत्रांवर कुठेही 'एमआयडीसी'चे नाव नाही. त्या जमिनीचा एक रुपयाही मोबदला म्हणून 'एमआयडीसी'ने मूळ मालकाला दिलेला नाही. प्रॉपर्टी कार्डवरही मूळ मालकाचेच नाव आहे. आजही पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये त्या मालमत्तेचा कर 'एमआयडीसी' नव्हे, तर मूळ मालकच भरत आहे. ही सगळी कागदपत्रे पाहूनच जमीन खरेदी केली आहे. पण तरीही आरोप झाल्यामुळे त्याचीही चौकशी झाली आहे. यासंदर्भात 1995 चा जीआरही लक्षात घ्यावा लागेल. जमीन संपादित करत असताना 'एमआयडीसी'ने दोन वर्षांत प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर ती प्रक्रिया आपोआप रद्द होते. यासंदर्भात मी सलग तीन अधिवेशनांमध्ये सातत्याने मी विचारणा करत आहे; पण विधानसभेत सरकारने उत्तर दिलेले नाही.'' 

खडसे म्हणाले.. 
- शेतीपलीकडे माझे कुठलेही उत्पन्न नाही. 
- आजही माझी बागायती शेती आहे. 15 वर्षांहून अधिक काळ मी सुधारित पद्धतीने शेती करत आहे. 
- 1996 पासून आतापर्यंत मी नियमितपणे इन्कमटॅक्‍स रिटर्न्स भरत आहे. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांमध्येही माझी संपत्ती जाहीर केली आहे. 
- यासंदर्भात कोणतीही शंका असती, तर निवडणूक आयोगाकडे किंवा इन्कम टॅक्‍स विभागाकडे तक्रार दाखल करता आली असती. 
- चौकशीला मी कधीही घाबरलो नाही. इतक्‍या चौकशा झाल्या, त्यात काय झाले ? 
- कोणत्याही प्रकारे एक रुपयाचाही गैरव्यवहार मी केलेला नाही. 
- माझी खासगी कंपनी नाही आणि खासगी शैक्षणिक संस्थाही नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com