Keshav Upadhye attacks Rahul Gandhi | Sarkarnama

राहूल गांधीचे आरोप बेछूट - केशव उपाध्ये 

भास्कर बलखंडे 
बुधवार, 19 डिसेंबर 2018

राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयानेच गैरव्यवहार नसल्याचा निकाल दिल्यामुळे 2019 च्या निवडणुकीत कोणता मुद्दा वापरायचा याचा कॉंग्रेसला प्रश्न पडला आहे. -  केशव उपाध्ये 

जालनाः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ आणि पारदर्शी राजवट दिली. काहीही करून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा डाग लावण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदीबाबत बेछूट खोटे आरोप केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राहुल गांधी यांच्या आरोपातील खोटेपणा उघड झाला आहे. राजकीय फायद्यासाठी देशाची सुरक्षितता धोक्‍यात आणल्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत केली. 

बुधवारी (ता19) भाजपा जिल्हा कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केशव उपाध्ये म्हणाले, राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारातील निर्णय प्रक्रिया, किंमत आणि भारतीय ऑफसेट पार्टनर या तीनही मुद्द्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने गैरव्यवहार नसल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे या मुद्द्यांवरून जाणीवपूर्वक चिखलफेक करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न हाणून पाडला गेला. 

राहूल गांधी यांच्याकडे राफेलबाबत पुरावे होते तर त्यांनी ते सर्वोच्च न्यायालयात मांडायला हवे होते. पण त्यांनी तसे केले नाही कारण त्यांच्याकडे काही पुरावेच नव्हते. केवळ सत्ताधारी पक्षाला बदनाम करण्यासाठी खोटेनाटे आरोप केले. असे आरोप करताना आपण देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करतो आहोत आणि सैनिकांचे मनोधैर्य खच्ची करत आहोत, याचेही भान राहुल गांधी यांनी ठेवले नाही. 

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून किंमतीबाबत सर्व तपशील मागून घेतला व आपल्या समाधानासाठी त्याचा अभ्यास केला. किंमतीचा तपशील जाहीर केला तर विमानांवर कोणती शस्त्रास्त्रे लावली आहेत याची माहिती उघड होईल व त्याचा शत्रूला लाभ होईल. यामुळे संरक्षण दलाचे अधिकारी ही माहिती उघड करण्यास विरोध करत होते, याची नोंद घ्यायला हवी. 

सर्वोच्च न्यायालयाने या विषयात निकाल दिल्यानंतरही संयुक्त संसदीय समिती नेमण्याचे कारण काय, असा सवाल करतांनाच भाजपा संसदेत चर्चा करण्यास तयार असल्याचे उपाध्ये यांनी सांगितले.

 

संबंधित लेख