Kej assembly : will Dr. Anjali Ghadge challenge Sangita Thombre again ? | Sarkarnama

केजमध्ये भाजपच्या संगीता ठोंबरेंना  डॉ.अंजली घाडगे पुन्हा आव्हान देणार ? 

दत्ता देशमुख 
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

मागच्या निवडणुकीत अचानक रिंगणात उतरलेल्या डॉ. अंजली घाडगे यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर ३५ हजारांच्या मतांचा पल्ला पार केला होता. आताही सामाजिक कामाच्या निमित्ताने डॉ. घाडगेंची सक्रीयता अधिकच वाढली आहे.

बीड : केज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ. अंजली घाडगे कामाला लागल्या आहेत . गेल्या विधानसभा निवडणुकीत केज मतदारसंघात  काँग्रेस पक्षातर्फे अचानक संधी मिळाल्यानंतर डॉ. अंजली घाडगे यांनी ३५ हजार मते मिळवली होती . येत्या विधानसभा निवडणुकीत केजची जागा काँग्रेस पक्षाला मिळाली तर डॉ. अंजली घाडगे पुन्हा भाजपच्या संगीता ठोंबरे यांना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत . 

काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत केजची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती . पण गेल्या २०१४च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांची आघाडी नव्हती . त्यामुळे काँग्रेस पक्षाने अचानक उमेदवारी देऊनही डॉ. अंजली घाडगे यांनी मोदी लाटेत ३५ हजार मतांची मजल मारली होती . येत्या विधानसभेला या डॉ पक्षांची आघाडी झाली तर कोणत्या पक्षाकडे केजजाणार हे महत्वाचे असेल . 

 केज मतदार संघात  डॉ. अंजली घाडगे यांनी निवडणुकीनंतरही मतदार संघातील संपर्क तुटू दिला नाही. आता तर सामाजिक उपक्रमांच्या निमित्ताने त्यांची सक्रीयता अधिकच वाढवून आगामी निवडणुकीत आपण उमेदवार असणारच हे त्यांनी अप्रत्यक्ष जाहीरच करुन टाकले आहे.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला बीड जिल्ह्यात आता उमेदवार शोधताना पक्षाच्या नाकी नऊ येतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर काँग्रेस विचाराचे बडे नेते राष्ट्रवादीत गेल्याने पक्षाची जिल्ह्यात पिछेहाट झाली. त्यातच आहे ती ताकद गटबाजीत विभागली गेली. 

दरम्यान, काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीत जिल्ह्यातील सहा जागांपैकी केवळ परळी मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला. मात्र, मागच्या वेळी दोन्ही पक्षांची आघाडी तुटल्याने  ऐनवेळी डॉ. अंजली घाडगे यांना केज या राखीव मतदार संघातून निवडणुक रिंगणात उतरविण्यात आले. 

 मात्र, अचानक निवडणुक रिंगणात उतरलेले उमेदवार पराभवानंतर दिसत नाहीत किंवा लाटेत विजयी झालेले राजकारणात फारकाळ टिकत नाहीत अशी शेकडो उदाहरणे असतात. मात्र, डॉ. अंजली घाडगे याला अपवाद ठरल्या. अचानक रिंगणात उतरावे लागलेल्या डॉ. घाडगे यांनी मतदार संघातील संपर्क तुटू दिला नाही. मागच्या सहा महिन्यांपासून तर त्या अधिकच सक्रीय दिसत आहेत. 

वॉटरकप स्पर्धेतील गावांना भेटी देऊन श्रमदान करणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या डॉ. घाडगे यांनी दिवाळी निमित्त तर आत्महत्याग्रस्तांच्या कुटूंबियांना दिवाळीच्या साहित्यासह कपडेही दिले. तर, मतदार संघातील अंबाजोगाई हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. शहरात पाय ठेवण्यासाठी त्यांनी तिथे गणपती सजावट देखावे स्पर्धा ठेवली. अलिकडे भेटीगाठी, उद॒घाटने तसेच सामाजिक कार्यक्रमांना त्यांची आवर्जुन हजेरी दिसत आहे. 

त्यातच त्यांनी संपर्क कार्यालय सुरु करण्याची तयारी केल्याने त्यांची ही सर्व तयारी आगामी विधानसभेसाठीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्यांच्या वाढदिवसा निमित्त मतदार संघभर लागलेले शुभेच्छाचे होर्डींग आणि बॅनर पाहून त्यांनीही मतदार संघात बऱ्यापैकी पाय रोवल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचा मतदार संघातील राबता पाहता आता माघार नाही असेच त्यांनी अप्रत्यक्ष जाहीर केल्याचे संकेत आहेत.

 पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या रजनी पाटील केजच्या तर जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदीही याच मतदार संघातील अंबाजोगाईचे. पण, एकाच पक्षातील या दोन नेत्यांत विळ्या - भोपळ्याचे सख्य आहे. मागच्या निवडणुकीत  डॉ. अंजली घाडगे   रजनी पाटील गटाकडून उमेदवार होत्या.

आता मात्र त्यांनी दोन्ही नेत्यांशी  आणि गटांशी समान सख्य तयार केले आहे. याचीच प्रचिती पक्षाचे नेते मल्लीकार्जुन खर्गे आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मेळाव्यात  आली. पाटील गटाच्या असतानाही राजकिशोर मोदी यांनी केजची जागा काँग्रेस पक्षाने लढवावी अशी मागणी केली आहे . 
 

संबंधित लेख