Keep children away from BLUE WHALE | Sarkarnama

सावधान- मुलांना 'ब्लू व्हेल' पासून दूर ठेवा

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

काही वेबसाईट्सने दिलेल्या माहितीनुसार, या खेळात प्लेअर्सला 50 वेगवेगळी आव्हाने दिली जातात. उदाहरणार्थ एखादा हॉरर चित्रपट एकट्याने बघणे किंवा स्वत:ला जखमी करून घेणे..... असे गेममध्ये असलेले प्रत्येक आव्हान पूर्ण झाले की त्याचा पुरावा खेळणाऱ्याला गेमवर द्यावा लागतो. या खेळाचा शेवटचा टप्पा असतो आत्महत्या करण्याचा....

 

नवी दिल्ली -  लहानमोठ्या सगळ्यांनाच मोबाईलवरचे विविध गेम्स भुरळ घालत असतात. विरंगुळा म्हणून हे ऑनलाईन गेम्स खेळताना त्याचे ऍडिक्शन कधी होते हे अनेकांना समजतही नाही. त्यामुळे अशा गेम्सच्या आहारी गेल्याने अनेक दुष्परिणामांचा सामना करावा लागतो. मोबाईल किंवा व्हिडिओ गेम्सच्या आहारी गेलेला वर्ग मोठा आहे. गेल्यावर्षी धुमाकूळ घातलेल्या 'पॉकेमॉन गो' या गेमचे तर अनेकांना वेड लागले होते. तरिदेखील 'कँडी क्रश','पॉकेमॉन गो', 'अँग्री बर्ड' या खेळांपर्यंत ठिक होते. परंतु, सध्या मुलांमध्ये लोकप्रिय होणाऱ्या 'ब्लू व्हेल' या गेममुळे मात्र पालकांची झोपच उडाली आहे. याचे कारण म्हणजे या गेममुळे अनेक लहान मुलांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

काही वेबसाईट्सने दिलेल्या माहितीनुसार, या खेळात प्लेअर्सला 50 वेगवेगळी आव्हाने दिली जातात. उदाहरणार्थ एखादा हॉरर चित्रपट एकट्याने बघणे किंवा स्वत:ला जखमी करून घेणे..... असे गेममध्ये असलेले प्रत्येक आव्हान पूर्ण झाले की त्याचा पुरावा खेळणाऱ्याला गेमवर द्यावा लागतो. या खेळाचा शेवटचा टप्पा असतो आत्महत्या करण्याचा. जर खेळणाऱ्याने हे आव्हान पूर्ण केले नाही तर त्यांना धमकीचे मेसेजही येतात, असे इंग्लंडमधल्या अनेक वेबसाईट्सने म्हटले आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सध्या या गेमबाबत सोशल मीडियावर अर्लट मेसेजेस फिरत आहेत. पालकांनी आपली मुले कोणता गेम खेळत आहे यावर लक्ष ठेवावे, अन्यथा त्यांच्या जीवाला धोका आहे, अशा प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत. एकदा हा गेम डाऊनलोड केला की तो डिलिट किंवा अनइन्स्टॉल करता येत नाही. यामुळे युजर्सची पर्सनल माहिती देखील हॅक होण्याचीही भिती निर्माण झाली आहे.

एका पोर्तुगीज वृत्तपत्राने प्रथम या खेळाविषयी आणि त्यामुळे पालकांमध्ये निर्माण झालेल्या दहशतीची माहिती प्रसिद्ध केली होती.

आतापर्यंत रशियामध्ये 100 हून अधिक मुलांनी या खेळामुळे आत्महत्या केली आहे. ही सर्व मुले 12 ते 16 वयोगटातील असल्याचे समोर आले आहे. हा गेम बनवणाऱ्या गेमर्सची पोलीस कसून चौकशी करत आहे. या खेळासंबधी एका गेमरला रशियन पोलिसांनी अटक केल्याचीही माहिती एका स्थानिक वृत्तपत्रांनी दिली आहे.

 

संबंधित लेख