Keep BJP Away in General Elections Appeals Sharad Pawar | Sarkarnama

भाजपला दूर सारून सर्वात मोठ्या पक्षाचा पंतप्रधान व्हावा - शरद पवार

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेस बळकट आहे. उत्तर प्रदेशात मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पार्टी आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पार्टी बलवान आहे. प्रत्येक राज्यातली स्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे त्या त्या राज्यातल्या बलशाली पक्षांना आपण एकत्र घेतले पाहिजे - शरद पवार

मुंबई - "आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बाजूला सारण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे आणि निवडणुकीनंतर ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील त्या पक्षाचा पंतप्रधान व्हावा," अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केली. आपण एक विचारांची लढाई लढत असून पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही, या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे पवार यांनी यावेळी स्वागत केले. 

निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आज मुंबईत झाली. त्यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, "निवडणुका होऊ देत. आपण भाजपला सत्तेपासून बाजूला काढू. त्यानंतर ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील, तो पक्ष पंतप्रधान पदावर दावा सांगू शकेल.'' भाजप विरोधी सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीत आघाडी करावी आणि 1977 आणि 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकांत जसे केले त्या प्रमाणे निवडणूक निकालानंतर पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवावा, असे मतही पवार यांनी यावेळी व्यक्त केले. आपण स्वतः सर्व राज्यांमध्ये जाऊन तेथील प्रादेशिक पक्षांना आघाडीत येण्याची विनंती करणार आहोत, असे पवार यांनी यावेळी सांगितले. 

मतदान यंत्रांबाबतही पवार यांनी चिंता व्यक्त केली. आगामी निवडणुकीत पुन्हा मतपत्रिकांद्वारे मतदान व्हावे, अशी सूचना पवार यांनी यावेळी केली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबाबत बोलताना ते म्हणाले, "काँग्रेसचे अशोक गेहलोत आणि अशोक चव्हाण यांच्याबरोबर आपल्या पक्षाचे जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल हे दोन नेते येत्या एक दोन आठवड्यांत जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहेत,"

यापूर्वी एका पक्षाच्या विरोधात अन्य सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्याची उदाहरणेही पवार यांनी यावेळी दिली. 1977 मध्ये काँग्रेसच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आले आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. 2004 मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरोधात अन्य पक्ष एकत्र आले. त्यावेळी भाजप विरोधी कुठल्याही पक्षाने पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता आणि कुणाही पक्षाकडे बहुमत नव्हते, असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. ''आताही नरेंद्र मोदी हे बलवान स्पर्धक असले तरीही देशातील जनता सजग आणि आपल्या पेक्षा हुशार बनली आहे,'' असेही पवार यावेळी म्हणाले.

गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेस बळकट आहे. उत्तर प्रदेशात मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पार्टी आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पार्टी बलवान आहेत, असे सांगून पवार म्हणाले, ''प्रत्येक राज्यातली स्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे त्या त्या राज्यातल्या बलशाली पक्षांना आपण एकत्र घेतले पाहिजे," 

भाजप विरोधी आघाडीत मनसे असेल काय या प्रश्नावर बोलताना ''हा विषय अद्याप चर्चेला आलेला नाही,'' असे उत्तर पवार यांनी दिले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल आपली भेट घेतल्याचे सांगून पवार म्हणाले, "राज यांनी मतदान यंत्रांबाबत व्यक्त केलेली चिंता रास्त आहे. सर्व भाजप विरोधी पक्षांनी मतदान यंत्रांच्या विरोधात एकत्र भूमिका घेतली पाहिजे, असे माझे मत आहे," दरम्यान, याच कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमधून 2014 मध्ये हकालपट्टी करण्यात आलेले काँग्रेस नेते संजय खोडके यांनी आज पवार यांच्या उपस्थितीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख