keep aisde three kings of satara : Mankumare | Sarkarnama

`साताऱ्यातील तीन राजांना बाजूला ठेवून मला उमेदवारी द्या`

उमेश भांबरे
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

सातारा जिल्ह्यातील तीन राजे म्हणजे उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे आणि रामराजे नाईक निंबाळकर. यातील दोघांचा उदयनराजे यांच्याशी संघर्ष सुरू आहे. त्यातून सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीत नक्की कोणाला उमेदवारी द्यायची, हा राज्यभर चर्चेचा विषय झाला. त्यावर भलताच उपाय जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांनी सुचवला. 

सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आज मुंबईत झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत सातारा लोकसभा मतदारसंघासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्याबाबतची भुमिका पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यापुढे मांडली. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले बैठक संपल्यावर पोहोचले तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले अनुपस्थित होते. 

लोकसभा मतदारसंघनिहाय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भुमिका जाणून घेण्यासाठी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमारे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, रमेश धायगुडे, दत्तानाना ढमाळ, अविनाश कदम, विजय नायकवडी, आदी उपस्थित होते.
 
दुपारी साडे बाराच्या दरम्यान, बैठकीस सुरवात झाली. यावेळी प्रमुख चारच पदाधिकाऱ्यांना भुमिका मांडण्याची संधी देण्यात आली. वसंतराव मानकुमारे यांनी साताऱ्यातील तीन राजे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांचा सध्या वाद सुरू असून हा वाद कधी मिटवायचा तेव्हा मिटू देत. पण या सर्वांना बाजूला ठेऊन सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला उमेदवारी द्यावी अशी अपेक्षा त्यांनी मांडली. 

रमेश धायगुडे, दत्तानाना ढमाळ यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. तर वाईचे विजय नायकवडी यांनी खासदार उदयनराजेंची सातारा मतदारसंघात असलेली ताकद लक्षात घेता गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत त्यांना मिळालेले लिड पक्षाने लक्षात घ्यावे. तसेच सर्वसामान्यांशी त्यांची असलेली नाळ आणि मतदारसंघातील लोकांची इच्छा लक्षात घेऊन पक्षाने उदयनराजेंनाच उमेदवारी द्यावी.

साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक अविनाश कदम यांनी उदयनराजेंच्या उमेदवारीला विरोध करत स्थानिक पातळीवर आमची कुचंबना होत असल्याचे सांगून ते म्हणाले, उदयनराजेंनी जिल्हा परिषद निवडणूकीत भाजपबरोबर राहून काम केले. तरीही जिल्हा परिषदेत, पंचायत समितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार ३५ हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून आले. याचा विचार पक्षाने करावा व सर्वसमावेशक उमेदवार द्यावा. आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय पक्षाने निर्णय घेऊ नये.

अविनाश कदम यांच्या भूमिकेला जयेंद्र चव्हाण, राजू भोसले यांनी पाठिंबा दिला. शिवेंद्रसिंहराजे भोसले बैठकीस उपस्थित नसल्याने आम्हाला स्वतंत्र वेळ द्यावा, अशी मागणी माजी सभापती राजू भोसले यांनी केली. 

मुंबईतील राष्ट्रवादीच्या बैठकीस उशीरा येऊनही खासदार उदयनराजे भोसले यांना शरद पवार यांनी व्यासपीठावर बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर उदयनराजे बाहेर आल्यावर पत्रकारांशी संवाद साधला. यानंतर संपूर्ण राज्य भरातून आलेल्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी उदयनराजेंसोबत फोटो काढले तसेच त्यांना शुभेच्छा ही दिल्या. यावेळी उदयनराजेंसोबत माजी सभापती सुनील काटकर, गितांजली कदम, सुनील सावंत, जयवंत पवार, सुहास राजेशिर्के, ऍड. दत्तात्रेय बनकर, जितेंद्र खानविलकर, विजय नायकवडी, विजय यादव, दत्ता बिचुकले उपस्थित होते. 

संबंधित लेख