kdcc | Sarkarnama

"केडीसीसी'तील 270 कोटींचं काय करायचं ? 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 मे 2017

जिल्हा बॅंकेने स्वीकारलेल्या बहुंताशी नोटा ह्या ठेवी व बचत खात्यावर भरल्या आहेत. महिन्याला व्याजापोटी 15 कोटीचा भुर्दंड बॅंकेला बसत आहे. यातील 30 ते 35 कोटी रुपये बॅंकेने चेस्ट करन्सी बॅंकेकडे जमा केले आहेत, पण अजूनही 270 कोटी रुपयांच्या नोटांची थप्पी बॅंकेत पडून आहे. या नोटा खराब होऊ नयेत याची दक्षता घेण्यासाठी उभारण्यात आलेल्या यंत्रणेचा खर्चही स्वतंत्र आहे. 

कोल्हापूर : नोटबंदीच्या काळात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने स्वीकारलेल्या 1000 व 500 च्या नोटांबाबत अजून निर्णय न झाल्याने बॅंकेत 270 कोटी रुपयांच्या नोटांची थप्पी पडून आहे. या नोटांमुळे बॅंकेला महिन्याला किमान 15 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. या नोटा स्वीकारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश देवूनही रिझर्व्ह बॅंकेने पुढील कार्यवाही केलेली नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी चलनातून 1 हजार व 500 च्या नोटा रद्द केल्या. सुरवातीचे तीन दिवस या नोटा स्वीकारण्याचे अधिकार जिल्हा बॅंकेला दिले होते. या काळात जिल्हा बॅंकेत सुमारे 249 कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या. बॅंकेकडे शिल्लक साठ्यात 55 कोटींच्या जुन्या नोटा होत्या, त्यामुळे एकत्रित सुमारे 305 कोटी रुपयांच्या नोटा बॅंकेकडे जमा झाल्या. त्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने अचानक जिल्हा बॅंकांना जुन्या नोटा घेण्यास मज्जाव केला. तसेच त्या नोटा स्वीकारल्याही नाहीत. 

राज्यात कोल्हापूर जिल्हा बॅंकेचा जुन्या नोटा स्वीकारण्यात तिसरा क्रमांक लागतो. या नोटा स्वीकाराव्यात म्हणून जिल्हा बॅंकांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावरील निर्णय देताना न्यायालयाने तातडीने या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले. पण पैसे भरलेल्यांची केवायसी तपासणीच्या नावांखाली रिझर्व्ह बॅंकेने हे पैसे रोखून धरले. पण कोल्हापूर जिल्हा बॅंकेची नाबार्डमार्फत चारवेळा चौकशी झाली. शेवटच्या चौकशीत तर प्रत्येक खात्याची "केवायसी' तपासण्यात आली. या तपासणीचा अहवाल रिझर्व्ह बॅंकेला जाऊन महिना होत आला, तरीही नोटा स्वीकारण्याबाबत सकारात्मक निर्णय झालेला नाही. परिणामी जिल्हा बॅंकेला मात्र व्याजापोटी मोठा फटका सहन करावा लागत आहे. 

 

संबंधित लेख