kcr will from new front on national level | Sarkarnama

दणदणीत विजयाचा गुलाल उधळलेले KCR नवी आघाडी स्थापणार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 डिसेंबर 2018

एन. चंद्राबाबू नायडू यांच्यावरही केसीआर यांनी टीकास्त्र सोडले.

हैदराबाद : भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांपासून देशाला मुक्ती मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रादेशिक पक्षांच्या नव्या आघाडीची घोषणा लवकरच करण्यात येईल. प्रादेशिक पक्षांना एकत्र करून भाजप आणि कॉंग्रेला पर्याय देणार असल्याचा दावा तेलंगणचे काळजीवाहू मुख्यमंत्री आणि तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी आज केला. 

राज्यात टीआरएसला घवघवीत यश मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर राव यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.  टीआरएसच्या विरोधात केलेल्या विखारी टीकेबद्दल केसीआर यांनी आज कॉंग्रेसचा समाचार घेतला. टीआरएसला मिळालेल्या घवघवीत यशातून कॉंग्रेसने बोध घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला. मुस्लिम आणि अनुसूचित जमातींना तेलंगणात देण्यात आलेल्या आरक्षणाच्या विरोधात न्यायालयाने दिलेला निकाल चुकीचा असल्याचा दावाही केसीआर यांनी केला. 

तेलुगू देसमचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यावरही केसीआर यांनी टीकास्त्र सोडले. देशातील भाजप मुक्त आणि कॉंग्रेसमुक्त करण्याची गरज असल्याचा दावा त्यांनी केला. विरोधकांची आघाडी करण्यासाठी फक्त इंजेक्‍शन पुरेसे नसून, मोठ्या शस्त्रक्रियेची आवश्‍यकता असल्याचे मतही त्यांनी या वेळी मांडले. राष्ट्रीय पातळीवर नव्या सकारात्मक बदलांची गरज असल्याचे तेलंगणमधील निकालातून दिसून येते, असेही केसीआर या वेळी म्हणाले.   

संबंधित लेख