शिवसेनेच्या औरंगाबादमधल्या कावड यात्रेत भाजपचाही सहभाग

 शिवसेनेच्या औरंगाबादमधल्या कावड यात्रेत भाजपचाही सहभाग

औरंगाबाद : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आयोजक असलेली विक्रमी कावड यात्रा शनिवारी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. 151 फुटांची कावड घेऊन निघालेली ही यात्रेवर गेल्यावर्षी पुर्णपणे शिवसेनेचीच छाप होती. यंदा मात्र शिवसेनेच्या कावड यात्रेत भाजपचाही सहभाग लक्षणीय ठरला. सध्या विविध मुद्यांवरून शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झडत आहेत. अशावेळी शिवसेनेने आयोजित केलेल्या कावड यात्रेत भाजप नेत्यांनी आर्वजून हजेरी लावल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

श्रावण महिन्यात हिंदूशक्तीची एकजूट आणि जागर दाखवण्यासाठी गेल्यावर्षीपासून शहरातून कावड यात्रा काढली जाते. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या संकल्पनेतून गेल्यावर्षी शिवसैनिकांनी 151 फुटांची कावड काढत शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. या यात्रेची वर्ल्ड बुुक ऑफ रेकॉडमध्ये देखील नोंद झाली होती. परंतु या कावड यात्रा काढण्यामागे आगामी विधासभा निवडणुकीची पुर्वतयारी म्हणून पाहिले गेले. 

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून अंबादास दानवे निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्यामुळेच त्यांनी हर्सुल ते खडकेश्‍वर भागातून कावड यात्रा काढत आपले बळ दाखवण्याचा प्रयत्न केला होता. राजकीय हेतूने कावड यात्रा काढण्यात आल्याची टिका देखील त्यावेळी विरोधकांकडून झाली. अशी टिका पुन्हा होऊ नये याची काळजी अंबादास दानवे यांनी घेतल्याचे दिसते. गेल्यावर्षी पुर्णपणे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली निघालेल्या कावड यात्रेत यंदा मात्र भाजपलाही सहभागी करून घेण्यात आले. शहरातील भाजपचे जुने कार्यकर्ते शालीग्राम बसैय्य सलग दुसऱ्या वर्षी कावड यात्रेत सहभागी झाले, पण यावेळी त्यांची भूमिका बदलली होती. त्यांना कावड यात्रेचे सहसंयोजक करण्यात आले होते. 

दानवेंकडून भाजप नेत्यांना फोन 
कावड यात्रा केवळ शिवसेनेची नाही तर तो हिंदुत्वाचा उत्सव आहे अशी साद घालत अंबादास दानवे यांनी भाजप नेत्यांना कावड यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, भाजप शहर-जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी या फोन करून दानवे यांनी कावड यात्रेचे आमंत्रण दिले होते. 

विशेष म्हणजे अंबादास दानवे यांच्या विनंतीला मान देवून भाजपच्या या नेत्यांनी देखील कावड यात्रेत सहभागी होऊन शिवसेना नेत्यांच्या मनातील मळभ दूर करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी सरकारनामाशी बोलतांना म्हणाले, कावड यात्रा शिवसेनेने जरी काढली असली तरी हा उत्सव हिंदूचा होता आणि आम्ही हिंदू आहोत. अंबादास दानवे यांनी कावड यात्रेत सहभागी होण्यासाठी मला व आमच्या इतर नेत्यांना फोन केला आणि आम्हीही सहभागी झालो. यात कुठलेही राजकारण नाही. 

दुभंगलेली मने जुळणार का? 
मे महिन्यात शहराच्या काही भागात जातीय दंगल उसळी होती. त्यावेळी भाजपने घेतलेल्या भूमिकेवरून शिवसेनेने जोरदार टिका केली. मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृहखात्यावर हल्ला चढवत दंगल सुरू होती तेव्हा भाजपचे नेते कुठे लपून बसले होते असा खडा सवाल देखील शिवसेनेने केला होता. पोलिस आणि दंगेखोरांच्या विरोधात शिवसेनेने काढलेल्या हिंदुशक्ती मोर्चाकडे त्यावेळी भाजपने पाठ फिरवली होती. सध्या समांतर जलवाहिनीच्या प्रस्तावावर महापालिकेच्या सभागृहात शिवसेनेने अचनाक घेतलेला यु टर्न, मुख्यमंत्र्यांकडे निधीसाठी मागितलेली लेखी हमी या मुद्यावरून शिवसेना-भाजपमध्ये गरमागरमी सुरू आहे. अशावेळी कावड यात्रेच्या निमित्ताने एकमेकांवर रोज टिका करणारे सेना-भाजपचे नेते एकत्रित आले. आता त्यांची दुंभगलेली मने जुळणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com