Karnataka governor serves revenge dish to Devegauda after 22 years | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

देवेगौडा यांच्या सोबतचा 22 वर्षापूर्वीचा राजकीय हिशोब राज्यपालांनी केला चुकता

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 16 मे 2018

'मौका सभी को मिलता है ' असेच  वजुभाई वाला  देवेगौडांना म्हणत असतील का ? 

पुणे : गुजरातमधील तत्कालिन मुख्यमंत्री सुरेश मेहता यांनी विश्‍वासदर्शक ठराव जिंकल्यानंरतही कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत मेहता सरकार 1996 केंद्राने बरखास्त केले होते. त्यावेळी एच.डी. देवेगौडा हे पंतप्रधान होते. त्यांनीच भाजपा सरकार बरखास्त केले होते.

त्यावेळी गुजरातचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते वजुभाई वाला. आज 22 वर्षानंतर दैवेगौडांचे चिरंजीव असलेल्या कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवत एक प्रकारे देवेगौडा यांचा राजकीय हिशोब चुकता करण्याची संधी राज्यपाल वजुभाई वाला यांच्यामार्फत भाजपाने साधली आहे.

कॉंग्रेस व जनता दलाने संयुक्तपणे सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतरही राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपाच्या येडियुरप्पा यांना कर्नाटकमध्ये सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले असून उद्या (ता.17) रोजी येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत.या पार्श्‍वभूमीवर 1996 साली गुजरातमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींची आठवण प्रकर्षाने होत आहे. भाजपा नेते शंकरसिंह वाघेला यांनी कॉंग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्री सुरेश मेहता यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. 

मात्र भाजपाच्या प्रयत्नांनी मेहता सरकारने त्यावेळी विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव जिंकला. यावर पंतप्रधान देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील केंद्र थांबले नाही. कृष्णपालसिंह हे त्यावेळी गुजरातचे राज्यपाल होते. त्यांच्याकडून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती वाईट असल्याचा अहवाल देवेगौडा यांच्या सरकारने मागविला व तातडीने बहुमतात असलेले गुजरात सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली.

 22 वर्षापूर्वी या साऱ्या घडामोडी घडत असताना गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असलेले वजुभाई वाला यांच्या हाती आता कर्नाटकच्या नव्या सरकारचे भवितव्य आहे. सत्तेच्या चाव्या कुणाच्या आता द्यायच्या हे आता त्यांनी ठरविले असून माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे चिंरंजीव कुमार स्वामी यांनी दूर सारत येडियुरप्पा यांना सरकार बनविण्याचे निमंत्रण दिले आहे.  कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी अखेर भाजपचेच नेते बी. एस. येडीयुरप्पा हे उद्या सकाळी साडे नऊ वाजता शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले. 'मौका सभी को मिलता है ' असेच  वजुभाई वाला  देवेगौडांना म्हणत असतील का ? 

संबंधित लेख