kardile and vikhe yuti in nagar | Sarkarnama

सत्काराच्या कार्यक्रमातून कर्डिले आणि विखे यांचीच युती घट्ट असल्याची ग्वाही

मुरलीधर कराळे
मंगळवार, 31 जुलै 2018

नगर : बाजार समितीच्या संचालकांच्या सत्काराच्या निमित्ताने कॉंग्रेसचे युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील व भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करून विरोधकांना चकीत तर केलेच पण इशाराही दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान नगर दक्षिणमध्ये डॉ. सुजय विखे यांना कर्डिले यांचे जोरदार पाठबळ असल्याचे डॉ. विखे यांनी दाखवून तर दिलेच पण भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनाही इशारा दिला आहे. कर्डिले हे राजकारणातील विविध पक्षातील नेत्यांचे गुरु असल्याची स्तुतीसुमने कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या कॉग्रेसच्या नेत्यांनी उधळल्याने कर्डिले यांची अन्य नेत्यांची जवळीक स्पष्ट होते. 

नगर तालुका बाजार समितीच्या स्वीकृत संचालकपदी संदीप कर्डिले, कानिफनाथ कासार, जगन्नाथ मगर, रावसाहेब साठे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा आमदार कर्डिले व डॉ. विखे पाटील यांनी सत्कार केला. कॉग्रेसचे आमदार अरुण जगताप, आमदार राहुल जगताप, भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात आगामी लोकसभा निवडणुकीतील गणिते मांडले गेले. आमदार राहुल जगताप यांनी कर्डिले हे आमचे राजकीय गुरू असल्याचा उच्चार करून ते भल्याभल्यांचेही गुरू आहेत, असे सांगितले. त्यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत कर्डिले यांची ताकद भाजपला नव्हे, तर कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीलाच असेल, हे पुन्हा स्पष्ट झाले. 
राहुरी कारखाना केवळ कर्डिलेंमुळेच सुरू 
डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाषणातून कर्डिले व आमचे वेगळे नाते आहे. आम्ही दोघेही एका विचाराने काम करीत आहोत. आम्ही दोघेही पक्षाचे धोरणे पाळत नसून, लोकांचा विचार करतो. लोकांपेक्षा पक्ष मोठा नाही, असे आम्ही दोघेही मानतो. राहुरी कारखाना केवळ कर्डिले यांच्यामुळेच सुरू होऊ शकला, अशी कबुली डॉ. विखे यांनी दिली. जिल्ह्यातील सर्वच नेते सोयीच्या राजकारणासाठी, गड ताब्यात ठेवण्यासाठी गुंतले आहेत. आम्ही दोघे मात्र केवळ जनतेच्या प्रश्नांसाठी गुंतलो असल्याचा टोला डॉ. विखे यांनी विरोधकांना लगावला. 
एकमेकां साह्य करू 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्डिले - विखे यांचे एकमेका साह्य करू असे धोरण आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात विखे यांनी कर्डिले यांना मदत करायची. राहुरी तालुक्‍यातील विखेंचे वर्चस्व असलेल्या गावांमधून कर्डिले यांना साथ द्यायची, तर कर्डिले यांनी दक्षिणेत नगर, श्रीगोंदे तालुक्‍यातून तसेच नगर शहरातून विखे यांना मदत करायची, हे धोरण ठरले असून ते अनेक घटनांतून सिद्ध झाले आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत आमदार कर्डिलेंची रसद भाजपच्या उमेदवाराला नव्हे, तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला असेल, हे स्पष्ट होत आहे. 

संबंधित लेख