karanataka home minister jaisidhheshwar swammy in solapur | Sarkarnama

जयसिद्धेश्‍वर स्वामींनी जातीचा खोटा दाखला देऊन लिंगायतांचा अवमान केला!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 एप्रिल 2019

देशात अडीचशे किलो आरडीएक्‍स आले कुणालाच थांगपत्ता लागला नाही. हजारो कोटी रुपयांचे घोटाळे करून मल्ल्या आणि नीरव मोदी देशातून पळून गेले. त्यामुळे स्वतःला देशाचे चौकीदार म्हणणारे पंतप्रधान "फेल' झाले आहेत

-   एम. बी. पाटील, गृहमंत्री (कर्नाटक)

सोलापूर : भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर स्वामी यांनी जातीचा खोटा दाखला देऊन समस्त लिंगायत समाजाचा अवमान केला आहे, महात्मा बसवेश्‍वरांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. लिंगायत समाज त्यांना माफ करणार नाही, अशी टीका कर्नाटकचे गृहमंत्री एम. बी. पाटील यांनी केली.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजिलेल्या सभेसाठी श्री. पाटील आज सोलापुरात आले होते. त्यावेळी काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्राचे माजी मंत्री प्रा. वसंत पुरके व अनिस अहमद यावेळी उपस्थित होते. 

श्री. पाटील म्हणाले,"मी देशाचा चौकीदार म्हणत लोकांच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न पंतप्रधानांकडून होत आहे. मात्र त्याचवेळी एक नाही दोन नाही तर तब्बल अडीचशे किलो आरडीक्‍स देशात आले, ही माहिती चौकीदाराला का कळाली नाही? हजारो कोटी रुपयांचे घोटाळे करून मल्ल्या व मोदी देशातून पळून गेले, त्यावेळी हे "चौकीदार' काय करत होते.''

चित्रदुर्गमध्ये पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरमधून उतरविण्यात आलेल्या ब्लॅकबॉक्‍समध्ये दोन हजारांच्या नोटा होत्या की आणखी काय होते, याबाबत पंतप्रधानांनीच खुलासा करावा. या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली असून, याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.   

संबंधित लेख