Karad : Pruthiviraj Chavhan shocks NCP in gram Panchayat elections | Sarkarnama

कऱ्हाड :राष्ट्रवादीला हादरे,  कॉंग्रेसच्या  पृथ्वीराज चव्हाण -उंडाळकर गटाची  सरशी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

चिठ्ठीने उघडले भविष्य 
तीन गावांतील सहा सदस्यांची मते समान झाली. तेथे चिठ्ठीद्वारे निवड झाली. त्यामध्ये पश्‍चिम सुपनेत तेजस्विनी गायकवाड विजयी झाल्या. किवळमध्ये कोमल साळुंखे, तारुखमध्ये योगेश शिवदास विजयी झाले. 

कऱ्हाड : तालुक्‍यातील 40 ग्रामपंचायतीमधील निकालांमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाला चांगले यश मिळाले आहे . 

 कऱ्हाड उत्तरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी धक्कादायक निकाल लागले असून, अंतवडी, किवळ, पाडळी आणि शामगाव येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्ता गमवावी लागली. कृष्णेकाठी भोसलेंचे वर्चस्व त्यांच्या गटांनी कायम राखले आहे.

 तारुख, डेळेवाडी, कासारशिरंबे, आणे येथे सत्तांतर झाले. दुशेरे, आटके, आरेवाडी, मनव, जुळेवाडी, विजयनगर, सुपने, येळगाव, कालगाव, जुने कवठे आदी गावांत सत्ता कायम राखण्यात सत्ताधारी गटांना यश आले. 

संवेदनशील वडगाव हवेलीमध्ये सत्तांतर झाले. तेथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जगदीश जगताप यांच्या सत्तेला हादरा देऊन तेथे त्यांचे बंधू जयवंत ऊर्फ बंडानाना जगताप यांची सत्ता आली. त्यांच्या पॅनेलचा 13 जागांवर विजय झाला. सरपंचपदाच्या उमेदवार सुनीता जगताप याही त्यांच्याच गटातून निवडून आल्या.

 कऱ्हाड उत्तरमधील किवळ, पाडळी आणि अंतवडी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्ता गमवावी लागली. तेथे सतांतर झाले. आमदार बाळासाहेब पाटील यांना मानणाऱ्या गटाकडील सत्ता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी आमदार उंडाळकर गटाला मानणाऱ्या समर्थकांकडे आली आहे. किवळमध्ये सूर्यकांत साळुंखे, पाडळीमध्ये सुरेखा जाधव, अंतवडीमध्ये राजेश माने सरपंच झाले.

 आटकेची सत्ता पैलवान धनाजी पाटील गटाने राखली असून, त्यांच्या गटाला सरपंचपदही मिळाले आहे. सुपनेची सत्ता कायम राखण्यात बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पाटील यांना यश आले. त्यांनी उंडाळकरांचे समर्थक महेंद्र पाटील यांच्या पॅनेलचा पराभव केला. प्रकाश पाटील यांच्या गटाचे अशोक  झिंब्रे हे सरपंच झाले आहेत.

 दुशेरे येथे भाजपचे चिटणीस अतुल भोसले यांचे समर्थक व कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव यांची सत्ता कायम राहिली आहे. तेथे जाधव यांच्या पत्नी सुमन जाधव या सरपंच झाल्या आहेत. आरेवाडी येथे माजी आमदार श्री. उंडाळकर यांच्या गटाचे लक्ष्मण देसाई व सहकाऱ्यांची सत्ता कायम राहिली आहे. त्यांच्या गटाच्या रेश्‍मा यादव सरपंच झाल्या. 

आणेमध्ये अतुल भोसले यांचे समर्थक श्रीरंग देसाई यांना धक्कादायक निकाल पाहावा लागला आहे. तेथे उंडाळकर गटाकडे सरपंचपद गेले असून, आशा आणेकर या सरपंच झाल्या आहेत. गोंदीमध्ये अतुल भोसले आणि उंडाळकर गट एकत्र होता. तेथे त्यांच्या गटाला बहुमत मिळाले असून, विरोधी मदनराव  मोहिते व अविनाश मोहिते गटाला दोनच जागांवर समाधान मानावे लागले आहे. तेथे जयाताई मदने सरपंच झाल्या.

 तारुखमध्ये माजी सभापती प्रदीप पाटील यांच्या गटाची सत्ता जाऊन तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दत्ता पाटील व कॉंग्रेसच्या गटाकडे सत्ता आली आहे. तेथे प्रियांका गुरव सरपंच झाल्या आहेत. तेथे भारतीय जनता पक्षाला केवळ एक जागा मिळाली आहे. कुसुरमध्ये माजी मुख्यंत्री चव्हाण, उंडाळकर आणि अतुल भोसले यांच्या गटाला प्रत्येकी तीन जागा मिळाल्या आहेत, तर चव्हाण यांच्या गटाच्या शोभाताई पाटील सरपंच झाल्या.

 मनवमध्ये उंडाळकर गटाची सत्ता कायम राहिली आहे. तेथे सरोजनी डांगे या सरपंच झाल्या आहेत. जुळेवाडीत भोसले गटाची सत्ता कायम राहिली असून, सरपंचपदी सुरेखा पुजारी यांची निवड झाली आहे. पश्‍चिम सुपनेतील उंडाळकर गटाची सत्ता कायम राहिली असून, तेथे त्या गटाच्या सुनंदा चव्हाण या सरपंच झाल्या आहेत. येळगावमध्ये उंडाळकर गटाची सत्ता कायम राहिली. तेथे उंडाळकर गटाचेच मन्सूर इनामदार सरपंच झाले. विरोधी भोसले गटाच्या समर्थकांना तेथे फक्त एकच जागा मिळाली. 

कासारशिरंबेमध्ये सत्तांतर झाले असून, तेथे माजी सरपंच बाबूराव यादव यांची सत्ता गेली आहे. तेथे उंडाळकर, चव्हाण आणि अविनाश मोहिते यांच्या गटाची सत्ता आली असून, यशोदा माने सरपंच झाल्या. जुने कवठेची सत्ता लालासाहेब पाटील यांच्याकडे राहिली असून, सरपंचपदीही तेच विराजमान झाले आहेत. डेळेवाडीमध्ये सत्तांतर झाले असून, तेथे उंडाळकर गटाकडील सत्ता राष्ट्रवादीचे समर्थक तात्यासाहेब बाबर यांच्याकडे गेली आहे. 

शामगावमध्ये कॉंग्रेसच्या शीतल गायकवाड सरपंच झाल्या. तेथे भाजपला चार आणि राष्ट्रवादीच्या तीन जागा आल्या आहेत. कालगावमध्ये राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली असून, तेथे संगीता चव्हाण सरपंच झाल्या. आमदार आनंदराव पाटील यांच्या विजयनगरमध्ये फक्त सरपंचपदासाठी निवडणूक लागली होती. तेथे त्यांच्याच गटाचे संजय शिलवंत निवडून आले. 

हवेलवाडीमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले यांच्या गटाची सत्ता आली. तेथे विकास थोरात सरपंच झाले आहेत. वानरवाडीमध्ये नाईकबा रयत पॅनेलची सत्ता आली. हनुमंतवाडीमध्ये रत्नापा कुंभार, गणेशवाडीमध्ये लक्ष्मी शिंदे, हिंगनोळेमध्ये मंगल देशमुख, साबळवाडीमध्ये गंगुबाई काकडे, ओंडोशी सुनीता मोरे, चरेगावमध्ये देवलताताई माने, धावरवाडीमध्ये महेश सुतार, कळंत्रेवाडीमध्ये लता जगताप, अंधारवाडीमध्ये धोंडीराम बर्गे, हनुमानवाडीमध्ये उत्तम कदम सरपंच झाले आहेत. 

 

संबंधित लेख