karad north politics | Sarkarnama

कऱ्हाड उत्तरेत भाजपचा "कदम'ताल! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 मे 2017

कऱ्हाड उत्तरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांचे मोठे प्रस्थ आहे. त्यांचे सध्याचे दोन विरोधक हे घोरपडे व कदम आहेत. हे दोघे विधानसभेचे दावेदार आहेतच, शिवाय जितेंद्र पवार आयत्यावेळी तिकिटाची मागणी करू शकतात. यापद्धतीने आणखी पक्षांतर होऊन भाजपमधील दावेदारांची संख्या वाढू शकते. 

सातारा : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या जितेंद्र पवार यांच्यानंतर आता कॉंग्रेसचे धैर्यशील कदम हे भाजपच्या रडारवर आहेत. मुख्यमंत्र्यांनी थेट मुंबई भेटीचे निमंत्रण त्यांना दिले आहे. राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांचा मतदारसंघ पोखरताना भाजपपुढे उमेदवारी कोणाला द्यायची, हा प्रश्‍न निर्माण होणार आहे, मात्र हा मतदारसंघ खेचण्यासाठी जोरदार मेहनत सुरू केल्याचे चित्र आहे. 

महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दोन्ही कॉंग्रेसमधील नाराजांना भाजपमध्ये घेऊन आगामी निवडणुकीची बांधणी सुरू केली आहे. वेगवान घडामोडी सध्या कऱ्हाड उत्तर मतदारसंघात सुरू आहे. गत निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडला होता. मनोज घोरपडे यांनी स्वाभिमानी- महायुतीकडून निवडणूक लढवली होती. प्रत्यक्ष लढतीत राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी विजयी परंपरा कायम राखली, तर कॉंग्रेसचे धैर्यशील कदम दुसऱ्या क्रमांकावर राहिले. निवडणुकीनंतर वर्षभरात मनोज घोरपडे हे भाजपमध्ये दाखल झाले. आगामी उमेदवारी मिळावी, म्हणूनच त्यांनी हे पक्षांतर केले आहे. 

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घोरपडे हे वर्णे गटातून विजयी झाले. राष्ट्रवादीच्या आमदारांनी मोठी ताकद लावूनही घोरपडे पराजित झाले नाहीत. त्यामुळे भाजपने अधिकची ताकद घोरपडे यांना दिली आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे खटाव तालुकाध्यक्ष जितेंद्र पवार यांनी चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाला मनोज घोरपडे उपस्थित होते. 

जिल्हा परिषदेच्या पुसेसावळी गटात माजी आमदार प्रभाकर घार्गे यांची पत्नी इंदिरा घार्गे यांना तिकीट दिल्याने नाराज झालेले जितेंद्र पवार यांनी आपल्या पत्नीला अपक्ष उभे केले. तर धैर्यशील कदम यांनी कॉंग्रेसमधून आपल्या पत्नीला उभे केले होते. राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजीतून इंदिरा घार्गे व जितेंद्र पवार यांच्या पत्नीचा पराभव झाला. तर धैर्यशील कदम यांची पत्नी विजयी झाली. त्यानंतरच्या घडामोडीत जितेंद्र पवार भाजपवासी झाले आहेत. आता धैर्यशील कदम हे भाजपच्या रडारवर आहेत. धैर्यशील कदम आगामी आमदारकी डोळ्यासमोर ठेवून भाजपमध्ये जाणार असतील, तर मनोज घोरपडेंचे काय होणार? हा प्रश्‍न आहे. 

 

संबंधित लेख