शिवसैनिकांची समजूत काढताना खासदार कपिल पाटलांची दमछाक

शिवसैनिकांची समजूत काढताना खासदार कपिल पाटलांची दमछाक

वाडा : भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांच्यावर शिवसैनिक नाराज असल्याने त्याचा फटका निवडणुकीत बसू नये, यासाठी शहापूर, भिवंडी, वाडा येथे गुप्त बैठका घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न खासदार पाटील करत आहेत.

शिवसैनिकांच्या मनोमीलनासाठी शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांना बरोबर घेऊन समेट घडवण्याच्या हालचाली जोरात सुरू आहेत; मात्र या वेळी भाजपचा एकही कार्यकर्ता सोबत न घेता खासदार स्वतःच फिरत आहेत. खासदार पाटील यांना तालुक्‍यात शिवसेनेच्या माध्यमातून किती मते पदरात पाडून घेता येतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार असून त्यांच्या बैठका वाड्यात चर्चेचा विषय बनल्या आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भिवंडी ग्रामीण विधानसभा आणि शहापूर विधानसभा मिळून वाडा तालुक्‍यातील 119 मतदान केंद्रे आहेत. या क्षेत्रात तालुक्‍यात शिवसेनेची ताकद मोठी आहे. तालुक्‍यातून जिल्हा परिषदेत 4 सदस्य, पंचायत समितीत 5 सदस्य; तर नवनिर्वाचित वाडा नगर पंचायतीत शिवसेनेच्या नगराध्यक्षा असून 6 नगरसेवकही निवडून आले आहेत. 

राज्यात शिवसेना-भाजप लोकसभा निवडणुका एकत्र लढत असले, तरी भिवंडी लोकसभा आणि पालघर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते हे उमेदवार निवडीवरून नाराज असून उमेदवारांचा प्रचार करणार नसल्याचे ते उघडउघड बोलू लागले आहेत. त्यामुळे शिवसैनिकांच्या नाराजीचा फटका पाटील यांना येणाऱ्या निवडणुकीत बसण्याची चिन्हे आहेत. भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्यावर असलेली शिवसैनिकांची नाराजी आता उघडपणे चर्चेचा विषय होत आहे. 2014 च्या निवडणुकीत शिवसैनिकांनी कपिल पाटील यांच्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले होती; परंतु विजयी झाल्यापासून आजतागायत कोणत्याही शिवसेना पदाधिकारी अथवा शिवसेना कार्यकर्त्यांची साधी भेटही त्यांनी घेतली नाही. कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात ते सहभागीही झाले नाहीत, अशी शिवसैनिकांची तक्रार आहे.

भाजप नेहमीच शिवसेनेला दाबण्यात पुढे असून वाडा पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर खासदारांच्या माध्यमातून दबावतंत्राचा वापर करून खोट्या केसेस दाखल केल्याचा आरोपही वाड्यात शिवसैनिकांच्या भेटीला आलेले खासदार पाटील यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी केल्याचे समजते. 

कार्यकर्त्यांनी मांडल्या तक्रारी 
मतदारसंघात कोणतेही ठोस असे विकासकाम झालेले दिसत नाही. तसेच वाडा नगर पंचायतीत सत्ताधारी शिवसेनेला भाजप नगरसेवक कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करता नेहमी अडचणीत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याची तक्रारही खासदार कपिल पाटील यांच्याकडे शिवसैनिकांनी बैठकांदरम्यान केल्याचे समजते. त्यामुळे वरवर जरी मनोमीलन झाल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्ष कार्यकर्ते किती निष्ठेने काम करतील, यावरच खासदार कपिल पाटील यांचे भवितव्य अवलंबून आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com