Kanchan Kul Campaign in Baramati and Daund | Sarkarnama

कांचन कुल दौंडला सुनेच्या तर बारामतीला लेकीच्या भूमिकेत

रमेश वत्रे
शनिवार, 6 एप्रिल 2019

बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल या माहेर आणि सासरचा चांगलाच फायदा उठवत आहेत. बारामतीला गेले की भाषणाला सुरवात करताना तुमच्या लेकीचा नमस्कार अशी सुरवात होते तर दौंड तालुक्यात असताना त्या तुमच्या सुनेचा नमस्कार असे म्हणत भाषणाला सुरवात करतात.

केडगाव : बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल या माहेर आणि सासरचा चांगलाच फायदा उठवत आहेत. बारामतीला गेले की भाषणाला सुरवात करताना तुमच्या लेकीचा नमस्कार अशी सुरवात होते तर दौंड तालुक्यात असताना त्या तुमच्या सुनेचा नमस्कार असे म्हणत भाषणाला सुरवात करतात.

कांचन कुल यांचे माहेर हे बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर तर सासर दौंड तालुक्यातील राहु येथे आहे. कांचन कुल यांना सासरची राजकीय पार्श्वभूमी मोठी असली तरी त्या गृहीणी म्हणून परिचित आहेत. लोकसभा निवडणुकीत उतरण्यापुर्वी त्यांनी कधीही जाहीर भाषण केलेले नाही.  असे असतानाही त्या थोडयाच अवधीत भाषणाचा चांगला जम बसवू लागल्या आहेत. बारामतीच्या पवार कुटुंबियांच्या विरोधातील भाषणांची त्यांची धार कमी असली तरी शेलक्या शब्दात त्या वर्मावर बोट ठेवत आहेत. त्या फार मोठे भाषण करत नाही. पण मतदारांची दुखरी नस त्यांना हळू हळू माहित होऊ लागली आहे.

बारामतीच्या जिरायत भागात पिण्याची पाण्याची टंचाई आहे. हा मुद्दा त्या भाषणातून हळूवारपणे मांडत आहेत. कुल कुटुंबियांची दारे तुमच्यासाठी 24 तास उघडी असतील अशी ग्वाही त्या भाषणातून देत आहेत. सुरवातीची तीन चार दिवस त्यांनी मुद्यांची चिठ्ठी जवळ ठेवत भाषण केले परंतु आठवडाभरातच त्या सहजतेने भाषण करू लागल्या आहेत. आमदार सुभाष कुल यांच्या निधनानंतर रंजना कुल या आमदार झाल्या. त्यांचीही गृहीणी म्हणून ओळख होती. त्यांनीही थोडयाच दिवसात भाषणकला अवगत करत विधानसभेत कामाचा ठसा उमटवला होता.

मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या पहिल्या भाषणाची सोशल मीडीयात खूप चर्चा झाली. त्या तुलनेत कांचन कुल यांची प्रगती चांगली आहे. इलेक्ट्रॅानिक माध्यमांच्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्या न अडखळता कॅमे-यासमोर सहजपणे उत्तरे देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी नमस्कार केला तर त्या त्यांच्या पाया पडतात.      

संबंधित लेख