Kamalnath forgives the head master who had called him bandit | Sarkarnama

आपल्याला 'डाकू' म्हणणाऱ्या मुख्याध्यापकाला कमलनाथ यांनी का माफ केले ?

वृत्तसंस्था
शनिवार, 12 जानेवारी 2019

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना जाहीर कार्यक्रमात डाकू म्हणणाऱ्या मुख्याध्यापकास स्वतः कमलनाथ यांनी माफ केले आहे.

भोपाळ : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना जाहीर कार्यक्रमात डाकू म्हणणाऱ्या मुख्याध्यापकास स्वतः कमलनाथ यांनी माफ केले आहे.

 

जबलपूर येथे एका शासकीय प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक असलेले हेडमास्तर मुकेश तिवारी यांनी कमलनाथ यांच्याविषयी बदनामीकारक विधान एका कार्यक्रमात केले होते. मुकेश तिवारी असे म्हणाले होते की, " हमारे शिवराजजी चाहे जैसे हो  ,पर कमलनाथ तो डाकू है.''

मुख्याध्यापकांनी असे तारे तोडल्यावर सहकारी शिक्षक शांत कसे बसणार? त्यांनी मुख्याध्यापकांच्या भाषणाची व्हिडिओ क्‍लिप व्हायरल केली.

ही व्हिडिओ क्‍लिप कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या हाती पडताच ते भडकले. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जबलपूरचे जिल्हाधिकारी श्री. भारद्वाज यांची भेट घेऊन मुख्याध्यापकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

जिल्हाधिकारी श्री. भारद्वाज यांनी हेडमास्तर मुकेश तिवारी यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्यांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून गुरुवारी निलंबित केले.

हा सर्व प्रकार कमलनाथ यांच्यापर्यंत पोहोचला. त्यावर आज शनिवारी कमलनाथ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हेडमास्तर तिवारी यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाबाबत बोलताना कमलनाथ म्हणाले, " लोकशाहीत प्रत्येकाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असायला हवे. हेडमास्तर तिवारी यांच्याविरुद्ध नियमानुसार कार्यवाही झाली आहे. पण मुख्याध्यापक पदापर्यंत पोचण्यासाठी त्यांनी किती परिश्रम घेतले असतील? त्यांना निलंबित केल्याने त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांनाही हालापेष्टांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई नियमानुसार योग्य असली तरी मागे घेण्यात यावी."

 "माझे सरकार प्रतिशोध घेणारे नाही .    मी व्यक्तिशः त्यांना माफ करतो. त्यांच्यावरील निलंबन मागे घ्यावे. चांगल्या शिक्षकाचे काम विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याचे असते. हे मुख्याध्यापक भविष्यात आपले काम चांगले करतील अशी मी आशा करतो.''

कमलनाथ यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आपल्याला माफ केल्याबद्दल हेडमास्तर मुकेश तिवारी यांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र आपल्या व्हिडिओत टॅम्परिग झाल्याचा कांगावा त्यांनी केला आहे . 

संबंधित लेख