Kalyanrao, I never bring politics in development : Haribau Bagde | Sarkarnama

कल्याणराव तुमच्या मनात भिती, पण मी विकासकामांच्या आड येण्याचे पाप करत नाही : हरिभाऊ बागडे 

जगदीश पानसरे
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

"कल्याणराव तुमच्या मनात भिती होती, म्हणून तुम्ही मला कळू न देता लोणीकरांकडे पत्र व्यवहार केला, त्यांनीही मला कळू दिले नाही. पण तुमच्या मनात जी भिती होती, तशी भिती मला कधी नव्हती आणि नाही. विकासकामाच्या आड येण्याचे पाप मी कधी केलेले नाही.

-हरिभाऊ बागडे

 

औरंगाबादः "कल्याणराव तुमच्या मनात भिती होती, म्हणून तुम्ही मला कळू न देता लोणीकरांकडे पत्र व्यवहार केला, त्यांनीही मला कळू दिले नाही. पण तुमच्या मनात जी भिती होती, तशी भिती मला कधी नव्हती आणि नाही. विकासकामाच्या आड येण्याचे पाप मी कधी केलेले नाही, करणारही नाही. कारण विकासकामे जनतेच्या पैशातून होत असतात, तुमच्या किंवा माझ्या खिशातून नाही," अशा शब्दांत बागडे यांनी कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांना सुनावले. 

फुलंब्री मतदारसंघातील पिसादेवी गावातील पाणीपुरवठा योजना, रस्त्यावरील पूल आणि रस्त्याच्या मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन व लोकार्पण आज (ता. 5) पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांची देखील उपस्थिती होती. यावेळी झालेल्या भाषणात बागडे-काळे यांच्यात चांगलीच जुंपली. 

पिसादेवी येथील पाणी पुरवठा योजनेसाठी नाना मी तुम्हाला कळू न देता गुपचूप पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यांशी पत्रव्यवहार केल्याचा गौप्यस्फोट माजी आमदार कल्याण काळे यांनी आपल्या भाषणात केला. तोच धागा पकडत विधानसभा अध्यक्ष व फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी कल्याण काळे यांना टोला लगावला. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीत हरिभाऊ बागडे यांच्याकडून डॉ. कल्याण काळे यांचा पराभव झाला. तेव्हापासून बागडे-काळे एका व्यासपीठावर जेव्हाही आले तेव्हा त्यांच्यात राजकीय कलगितुरा रंगलेला पहायला मिळाला. पिसादेवी येथील कार्यक्रमात देखील पुन्हा याचा अनुभव उपस्थितांना आला. 

पाणी पुरवठा योजनेचे श्रेय एकट्या हरिभाऊ बागडे यांना मिळू नये याची खबरदारी घेत डॉ. कल्याण काळे यांनी या योजनेसाठी आपणही कसे प्रयत्न केले याचा खुलासा केला. झालर क्षेत्रातील 26 गावांचा विकास रखडल्याचा ठपका ठेवत त्यासाठी प्राधिकरण नेमण्याची मागणी कल्याण काळे यांनी केली. 

इंदौरच्या धरतीवर प्राधिकरण नेमा आणि तुम्हीच अध्यक्ष व्हा अशी सूचना करतांनाच तालुक्‍याच्या विकासासाठी आपल्याला राजकीय जोडे काढून काम करावे लागेल असा चिमचा काढत अप्रत्यक्षपणे बागडे यांच्यावर राजकारण करत असल्याचा आरोप केला 

झालरचा आरखडा आघाडी सरकारनेच रखडवला 
डॉ. कल्याण काळे यांच्या आरोप आणि गुपचूप पत्र पाठवून पाठपुरावा केल्याच्या गौप्यस्फोटावर हरिभाऊ बागडे यांनी मग आपल्या भाषणातून उत्तर दिले. मी विकासकामात राजकारण आणत नाही आणि भेदभावही करत नाही असे स्पष्ट करत झालर क्षेत्राचा विकास आरखडा रखडण्याचे काम आघाडी सरकारच्या काळात झाले असा पलटवार केला. उलट झालर क्षेत्राचा नकाशा तयार करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी बोलून तीन-चारवेळा बैठका घेतल्या आणि तो तयार करून घेतल्याचा दावा त्यांनी केला. 

पिसादेवी पाणी पुरवठा योजनेसाठी एमआयडीसीतून पाणी मिळावे यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मदत केल्यामुळेच हा प्रश्‍न मार्गी लागल्याचे स्पष्ट करत त्यांनी शिवसेनेलाही योजनेचे श्रेय दिले. वर्षाच्या आत गावाला पाणी मिळेल असे बागडे यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख