kalyan-fir-against-kdmc-bjp-leader-varun-patil | Sarkarnama

`केडीएमसी'तील भाजपा गटनेते वरुण पाटील वादाच्या भोवऱ्यात; 66 गुंठे जमीन हडपल्याचा आरोप 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 सप्टेंबर 2018

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे भाजपाचे नगरसेवक तथा गटनेते वरुण पाटील यांच्यावर 66 गुंठे जमीन हडपल्याचा आरोप तसेच शेतकऱ्याचे अपहरण केल्याचा गंभीर आरोपही कल्याण नजीक असलेल्या इताडे गावात राहणाऱ्या पाटील कुटुंबियांनी केला आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे भाजपाचे नगरसेवक तथा गटनेते वरुण पाटील यांच्यावर 66 गुंठे जमीन हडपल्याचा आरोप तसेच शेतकऱ्याचे अपहरण केल्याचा गंभीर आरोपही कल्याण नजीक असलेल्या इताडे गावात राहणाऱ्या पाटील कुटुंबियांनी केला आहे.

पाटील कुटुंबियातील संतोष पाटील हे गेल्या दोन वर्षांपासून बेपत्ता आहे. संतोष यांचे भाऊ अनिल पाटील हे अद्याप त्यांचा शोध घेत आहे. 22 ऑगस्ट 2016 रोजी संतोष हे उल्हासनगरला कामानिमित्त गेले होते. मात्र ते पुन्हा घरी परतलेच नाही. कल्याण पश्चिम येथील प्रेम ऑटो परिसरात त्यांची दुचाकी सापडली होती. सावद गाव येथे आमच्या मालकीची 27 गुंठे जागा असून ही जागा विकत घेण्यासाठी नगरसेवक वरुण पाटील व त्याचे साथीदार भाऊ संतोष याला भिवंडी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात घेऊन गेले होते. मात्र पाटील यांच्या साथीदारांनी 27 गुंठे ऐवजी 66 गुंठे जागा आपल्या नावावर करून घेतली, असा खळबळजनक आरोपही पाटील कुटुंबियांनी केला आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून भावाचा काहीच पत्ता लागत नसल्याने पाटील कुटुंबियांनी आपली व्यथा प्रसिद्धी माध्यमांकडे मांडली. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला असून अद्यापही संतोष बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी वरुण पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 

ज्या  माणसाला कुलमुखत्यारपत्र दिले होते, त्याच्याकडून ही जागा विकत घेतली असून संतोष पाटील या व्यक्तीला मी कधी भेटलोही नाही. त्यामुळे अपहरणाचा जो आरोप केला गेला आहे, त्यात काही तथ्य नाही. याबाबत पोलिसांनी माझा जबाब नोंदवला आहे. 

- वरुण पाटील, गटनेते, भाजप 

गरीब लोकांना न्याय मिळणे गरजेचे आहे. वरुण पाटील हे सत्तेचा दुरुपयोग करून नागरिकांची लुट करत आहेत. अशा कितीतरी नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे. 

- विनया पाटील, महिला पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस
 

संबंधित लेख