Kakde is trying to corner Girish Bapat & Yogesh tilekar on Yewlewadi plan ? | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

येवलेवाडी आराखड्यावरून काकडे बापट -टिळेकरांची कोंडी करणार ? 

सरकारनामा
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

खासदार संजय काकडे यांनी येवलेवाडी विकास आराखड्यातील बदलल्या गेलेल्या आरक्षणांची संपूर्ण माहिती पुणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याकडे मागितली आहे.

पुणे : येवलेवाडी विकास आराखड्यातील बदलल्या गेलेल्या आरक्षणांच्या मुद्द्यावर भाजपचे राजसभेचे खासदार संजय काकडे पालकमंत्री गिरीश बापट आणि आमदार योगेश टिळेकर यांची कोंडी करणार अशी चिन्हे दिसत आहेत . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याचा इशारा देत काकडेंनी बापट आणि टिळकांना घरचा आहेर दिला असून विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत दिले आहे . 

खासदार संजय काकडे यांनी येवलेवाडी विकास आराखड्यातील बदलल्या गेलेल्या आरक्षणांची संपूर्ण माहिती पुणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याकडे मागितली आहे. या विकास आराखड्यात कोणतीही चुकीची कामे होऊ देणार नसून यासंबंधी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती राज्यसभा खासदार व भाजपचे सहयोगी सदस्य खासदार संजय काकडे यांनी आज दिली.

येवलेवाडी विकास आराखडा तयार करण्यात आला त्यावेळी कोणती आरक्षणे त्यात होती? नंतर पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये कोणती आरक्षणे उठविण्यात आली व बदलण्यात आली? हे बदल का करण्यात आले? या सर्व आरक्षणांची सर्व्हे नंबरसह सविस्तर माहिती त्वरित द्यावी, असे पत्र खासदार संजय काकडे यांनी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांना 12 सप्टेंबर रोजी दिले आहे. 

शहराच्या सर्वांगीण विकासाकरीता पुणेकरांनी आम्हाला म्हणजे भाजपला बहुमताने सत्ता दिली. या सत्तेचा वापर पुणेकरांच्या हितासाठी व विकासासाठीच झाला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष सर्वसामान्य माणसाचा विकास हे आहे.

त्यामुळे महापालिकेत कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम होऊ देणार नाही. येवलेवाडीच्या विकास आराखड्यात जर, चुकीचे बदल करुन आरक्षणे बदलली असतील अथवा काढली असतील तर, नगरविकास खात्याकडे व खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन हे चुकीचे प्रकार थांबविण्याचे काम मी करणार आहे, असेही खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

 

संबंधित लेख