J.P. Gupta is the new secretary to OBC department | Sarkarnama

ओबीसी खात्याला अखेर सचिव मिळाला ; जे. पी. गुप्ता यांची  नियुक्‍ती

सकाळ न्यूज नेटवर्क 
शुक्रवार, 21 जुलै 2017

गुप्ता यांच्या नियुक्‍तीसोबतच सरकारने आणखी दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. युवक व क्रीडा विभागाचे आयुक्‍त विजय झाडे यांची सहकार आयुक्‍त पदावर नियुक्‍ती केली असून, व्ही. एन. सूर्यवंशी यांची बदली रायगडच्या जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली आहे. 

मुंबई   :  राज्य सरकारात नव्याने अस्तित्वात आलेल्या ओबीसी खात्याला अखेर सचिव मिळाला असून सरकारने या पदावर जे. पी. गुप्ता यांची आज नियुक्‍ती केली. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात स्वतंत्र ओबीसी खात्याची निर्मिती केली होती. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे हे खाते पूर्ण क्षमतेने काम करू शकत नसल्याने जे. पी. गुप्ता यांची खात्याचे सचिव म्हणून नियुक्‍ती करण्यात आली. 

सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत अनुसूचित जातीसह विमुक्‍त जाती, एनटी, ओबीसी आणि विशेष मागास प्रवर्ग या जातींचा समावेश होता. यामुळे सामाजिक न्याय विभागाकडे कामांचा प्रचंड बोजा होता. त्यामुळे प्रत्येक जाती समूहाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात अनेक अडचणींचा सामना सरकारला करावा लागत होता. 

तसेच ओबीसीसाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्याची मागणीही करण्यात येत होती. त्यामुळे सरकारने स्वतंत्र विभाग निर्माण केला. सुरवातीला या विभागाचे कामकाज फडणवीस यांच्याकडे होते. कालांतराने याचा कार्यभार जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला. आता खात्याला नवीन सचिव मिळाल्याने विभागाचे कामकाज सुरळीत होण्यास मदत होणार आहे. 

 

संबंधित लेख