Jolt to Bahujan Vikas Aghadi in Palghar | Sarkarnama

पालघरमधून 'शिट्टी' गायब : हितेंद्र ठाकूरांना झटका

वैदेही काणेकर
शनिवार, 13 एप्रिल 2019

पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीला जबरदस्त झटका बसला आहे. निवडणुक आयोगाने त्यांचं 'शिट्टी' हे निवडणुक चिन्हंच गोठवले आहे. त्यामुळे त्याचा सर्वात मोठा फायदा थेट शिवसेनेला मिळणार आहे.

पालघर : पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीला जबरदस्त झटका बसला आहे. निवडणुक आयोगाने त्यांचं 'शिट्टी' हे निवडणुक चिन्हंच गोठवले आहे. त्यामुळे त्याचा सर्वात मोठा फायदा थेट शिवसेनेला मिळणार आहे.

पालघर लोकसभा मतदार संघात शिवसेना विरुद्ध बहुजन विकास आघाडी असाच थेट सामना आहे. मात्र, मतदानापूर्वीच बहुजन विकास आघाडीचं ओळख असलेलं 'शिट्टी' हे  निवडणुक चिन्हं निवडणुक आयोगाने गोठवले आहे. पालघरमध्ये बहुजन महापार्टीच्या उमेदवारानेही शिट्टी या निवडणुक चिन्हासाठी आग्रह धरला होता. मात्र, या संदर्भातला वाद चिघळल्यावर बहूजन विकास आघाडीने मुंबई हायकोर्टात दाद मागितली. मुंबई हायकोर्टाने वाद निवडणुक आयोगाकडेच सोपवला. आणि निर्णय घेण्याचा अधिकार दिला. त्यामुळे केंद्रीय निवडणुक आयोगाचंही दार ठोठवण्यात आले.

आज पहाटे पालघर निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी 'शिट्टी' हे निवडणुक चिन्हं कोणालाच न देण्याचा निर्णय जाहीर केला. याचा सर्वात मोठा फटका थेट बहुजन विकास आघाडीला बसणार आहे. तर थेट फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला मिळणार आहे. निवडणुक आयोगाच्या या निर्णय प्रक्रियेत दगा फटका होऊ नये यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी रात्रभर तळ ठोकला होता. मात्र, अखेर बहूजन विकास आघाडीची 'शिट्टी' काही वाजलीच नाही. त्यामुळे त्यांना आता मतदारांकडे नवीन निवडणुक चिन्ह पोहचवण्याची कसरत करावी लागणार आहे.'

संबंधित लेख