प्रकाश आंबेडकरांची वेगळी चूल भाजपच्या सोयीची : जोगेंद्र कवाडे 

प्रकाश आंबेडकरांची वेगळी चूल भाजपच्या सोयीची : जोगेंद्र कवाडे 

नागपूर : रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांशी आघाडी न करता वंचितांच्या नावावर उभा केलेला नवा सुवतासुभा भाजपच्या सोईसाठी असल्याचे मत ज्येष्ठ रिपब्लिकन नेते व आमदार जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले आहे. 

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधी म्हणून जोगेंद्र कवाडे उपस्थित होते.

यानंतर "सरकारनामा'शी बोलताना जोगेंद्र कवाडे म्हणाले, सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यात सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यादृष्टीने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी दोनवेळा बैठका घेतल्या. या बैठकीला प्रकाश आंबेडकर हजर राहिले नाहीत. याउलट ते "एमआयएम' या पक्षाशी आघाडी करून मेळावे घेत आहेत. त्यांनी यासाठी वंचिताची आघाडी निर्माण केली आहे. या वंचिताच्या आघाडीतून वंचिताचा फायदा तर होणार नाही झालाच तर त्याचा फायदा "लब्धप्रतिष्ठित' भाजपला होणार आहे. 

प्रकाश आंबेडकरांचा हा मार्ग भाजपला मजबूत करण्यासाठी असल्याची भावना रिपब्लिकन जनतेमध्ये आहे. "एमआयएम'बद्दल हीच भावना मुस्लिम समाजामध्ये आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये नांदेड व परभणी येथे एमआयएमचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. एमआयएमला मत म्हणजे नेमका कुणाला फायदा? याचे गणित या शहरांमधील मुस्लिम मतदारांना कळले आहे. हेच गणित राज्यातील रिपब्लिकन जनतेला सुद्धा कळले आहे. त्यामुळे आंबेडकरांनी हा मार्ग सोडून धर्मनिरपेक्ष आघाडीमध्ये यावे, असे आवाहन कवाडे यांनी केले आहे. 
प्रतिष्ठेचा मुद्दा करू नये 


आंबेडकरांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा करू नये, असे सांगून कवाडे म्हणाले, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या बैठकांना येण्यात त्यांना कमीपणा वाटत असेल तर त्यांनी बैठक आयोजित करावी, या बैठकीला कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससह इतर धर्मनिरपेक्ष पक्षांचे नेते उपस्थित राहतील, असेही कवाडे यांनी सुचविले आहे.

परंतु कोणते तरी कारण सांगून मतांच्या विभाजनाचे राजकारण करायचे असल्यास ही चाल रिपब्लिकन जनता उमजून आहे, हे प्रकाश आंबेडकरांनी लक्षात घ्यावे, असा इशारा कवाडे यांनी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com