jogendra kawade | Sarkarnama

जोगेंद्र कवाडेदेखील भाजपच्या प्रेमात?

संजीव भागवत
शुक्रवार, 5 मे 2017

मुंबई : कॉंग्रेसच्या कोट्यातून विधानपरिषदेत आमदार असलेल्या जोगेंद्र कवाडे आणि त्यांचा पीपल्स रिपब्लिकन पार्टी हा पक्ष भाजपच्या प्रेमात पडला आहे. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच कवाडे यांच्या पीआरपीने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुंबई : कॉंग्रेसच्या कोट्यातून विधानपरिषदेत आमदार असलेल्या जोगेंद्र कवाडे आणि त्यांचा पीपल्स रिपब्लिकन पार्टी हा पक्ष भाजपच्या प्रेमात पडला आहे. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच कवाडे यांच्या पीआरपीने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या निवडणुकीत पाठिंब्यासाठी भाजपने कोणतीही मागणी न करता पीआरपीच्या या पाठिंब्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा पाठिंबा केवळ स्थानिक स्तरावरच व माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासाठी असल्याचे पीआरपीकडून सांगण्यात येत असले तरी कवाडे यानिमित्ताने भाजपशी जवळीक साधत आहेत की, काय असा प्रश्‍न त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित केला जात आहे. 

पीआरपीचे प्रमुख प्रा. जोगेंद्र कवाडे हे कॉंग्रेसच्या तिकिटावर विधानपरिषदेचे आमदार आहेत. राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या विरोधात त्यांची कायम भूमिका असते. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीतही कवाडे हे या दोन्ही पक्षाच्या विरोधातच लढले होते. दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या संघर्ष यात्रेतही कवाडे सरकारच्या विरोधात ठाम उभे असताना अचानक त्यांनी पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत स्थानिक स्तरावर भाजपला पाठिंबा दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. 

पनवेल महापालिका निवडणुकीत रिपाइंच्या आठवले गटाने यापूर्वीच भाजपला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. त्यातच कवाडे यांच्या पीआरपीच्या पाठिंब्याने पनवेलमध्ये दोन आंबेडकरी पक्ष भाजपच्या बाजूने उभे राहिल्याचे चित्र भाजपकडून रंगवले जात आहे, मात्र कवाडे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये भाजपच्या पाठिंब्यावरून मोठी नाराजी असल्याचेही कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते. 

पनवेल महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या 24 मे रोजी होत आहे. या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणारे पत्र पीआरपीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, रायगड जिल्हाध्यक्ष सीताराम कांबळे, प्रदेश सहसचिव नरेंद्र गायकवाड यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना नुकतेच दिले आहे. या निवडणुकीत पीआरपी भाजपच्या प्रचारासाठीही उतरणार असल्याचे पीआरपीचे जिल्हाध्यक्ष सीताराम कांबळे यांनी सांगितले. 
 

संबंधित लेख