Jitendra Awhad Says Feeling Unsafe in this Coutry | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

हा माझा देश नाही, असे वाटू लागलंय.. जितेंद्र आव्हाड यांची भावना

सुशांत सांगवे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे समिती यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आव्हाड यांनी ‘भारतीय संविधानाचा उद्देश आणि आजचे वास्तव’ या विषयावर संवाद साधला. सबकुछ बदल सकता हैं, देश का संविधान नहीं, अशी घोषणाही त्यांनी दिली.

लातूर : ‘‘एका नथुरामने देशाला कलंक लावला होता. आता असे अनेक नथुराम तयार होत आहेत. ते विचारवंतांच्या हत्या करत आहेत. दंगली लावण्याचा-भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. महिला-मुली असुरक्षित आहेत. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. झुंडशाही लोकशाहीवर हल्ले करत आहे. तरीही कोणी ब्र उच्चारत नाही. देशात गेल्या चार वर्षांत तयार झालेले हे वातावरण पाहून हा देश माझा नाही, असे वाटू लागलंय’’, अशा भावना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्या. तुमचे सरकार आल्यावरच अशा घटना का घडतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे समिती यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आव्हाड यांनी ‘भारतीय संविधानाचा उद्देश आणि आजचे वास्तव’ या विषयावर संवाद साधला. सबकुछ बदल सकता हैं, देश का संविधान नहीं, अशी घोषणाही त्यांनी दिली. या वेळी दलित महासंघाचे डॉ. मच्छिंद्र सकटे, समितीचे अध्यक्ष गोरख शिंदे, विलास जाधव, आशा भिसे आदी उपस्थित होते.

आव्हाड म्हणाले, ‘‘संविधान हे विशिष्ट वर्गाला कधी रूचलेच नाही. त्यामुळे संविधान हलविण्याचे वेळोवेळी प्रयत्न होत आहेत. यातूनच संविधान जाळण्याचे कृत्य या देशात झाले. तरीही कोणावर गुन्हाही दाखल होत नाही. मनुवाद्यांची पकड घट्ट होत आहे. अशावेळी आपण सर्वांनी एकत्र येऊन पेटून उठले पाहिजे. संविधानावर वाकडी नजर टाकणाऱ्यांना वेळीच अडवले पाहिजे. पण तसे होतानाही दिसत नाही. त्यामुळे आता यापुढे शांत राहून चालणार नाही. आजच्या व्यवस्थेविरोधात बोला. कारण येणाऱ्या काळात ते लोक दंगलीसुद्धा घडवतील. मराठा मोर्चाच्यावेळीच त्यांना हे करायचे होते. दंगली झाल्या असत्या तर राज्यातील शांतता, एकता धोक्यात आली असती. अशा घटना घडवून आणणाऱ्या, ज्यांच्या घरी जीवंत बॉम्ब सापडतात अशांचा बाप कोण आहे, हे राज्याला कळले पाहिजे.’’

अाव्हाड म्हणाले...

- आल्यानंतरच सर्वसामान्यांना संविधान धोक्यात आहे, असे का वाटते

- आरक्षणाच्या विरोधात असलेलेच सत्तेत आहेत. ते आरक्षण देणार नाहीत

- झुंडशाही ही लोकशाहीवर अतिक्रमण करते तेव्हा देश धोक्यात आहे, असे समजा

- आजुबाजुच्या घटना पाहून संविधानाचा उद्देश पराभूत होताना दिसत आहे.

- कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिस यांची एकत्रित समिती स्थापन करून त्यांच्याकडे विचारवंतांच्या हत्येचा तपास सोपवा 

संबंधित लेख