डॉन दाऊदची घरी ऐशोआरामात राहू देण्याची अट आंबेडकरांनी तरी मान्य केली असती का:  आव्हाड

दाऊदची एक अट होती की त्याला पोलिसी खाक्या दाखवायचा नाही आणि त्याच्या घरातच त्याला नजरकैदेत ठेवायचे. भारतातील कोणताही सुजाण नागरिक दाऊदची ही अट मान्य करणारा नसेल.-आ. जितेंद्र आव्हाड
डॉन दाऊदची घरी ऐशोआरामात राहू देण्याची अट आंबेडकरांनी तरी मान्य केली असती का:  आव्हाड

ठाणे :   "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाहिले जात आहे. मात्र, प्रसिद्धीसाठीची विधाने करुन त्यांनी स्वत:चे हसे करुन घेऊ नये; अपुर्‍या माहितीवर कोणत्याही प्रकारचे विधान करुन आपल्यातील अपरिपक्वतेचे दर्शन घडवू नये," असा सल्ला  राष्ट्रवादीचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यामुळेच दाऊदला भारतात आणता आले नाही, असे विधान केले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा भारतात परत येऊ इच्छित होता . विधिज्ञ  राम जेठमलानी यांनी तसा प्रस्ताव दिला होता पण शरद पवार हे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी या विषयात स्वारस्य दाखवले नाही . असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी आज केला होता . 

त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना  आ. जितेंद्र आव्हाड म्हणाले ,"बाबासाहेब आंबेडकरांचे वारस म्हणून आंबेडकरी चळवळीची परंपरा ते चालवतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या आताच्या विधानाकडे पाहता, बाबासाहेबांवर प्रेम करणार्‍या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रचंड वाईट वाटत आहे. शरद पवारांच्या बाबतीत दाऊद संदर्भात केलेले प्रकाश आंबेडकर यांचे विधान हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. 1993 सालचा इतिहास अनेकांना पाहित आहे. दाऊदला भारतात आणण्याचा प्रस्ताव जेव्हा आला. त्यावेळी दाऊदने काही अटी ठेवल्या होत्या. "

श्री. आव्हाड पुढे म्हणाले ,"दाऊदची एक अट होती की त्याला पोलिसी खाक्या दाखवायचा नाही आणि त्याच्या घरातच त्याला नजरकैदेत ठेवायचे.  भारतातील कोणताही सुजाण नागरिक दाऊदची ही अट मान्य करणारा नसेल. तेच शरद पवार यांनी केले. त्याच्या या दोन्ही अटी शरद पवार यांनी फेटाळून लावल्या. पोलीस दलसासमोर जेव्हा हा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळीही विरोधच करण्यात आला. शरद पवार यांनी त्यावेळी उलटा निरोप पाठवला की, “ भारताचे कायदे मान्य असतील तर आधी शरणागती पत्करायची; नंतर पुढचे -पुढे बघू” या निरोपानंतर दाऊद कराचीला परागंदा झाला. तो आजतागायत कोणाला दिसलाच नाही. डॉन दाऊदची तुरुंगात नाही तर स्वतःच्या घरी ऐशो आरामात राहू देण्याची अट आंबेडकरांनी तरी मान्य केली असती का? "

" प्रकाश आंबेडकर यांनी या इतिहासाची माहिती घेतली असती. तर चुकीच्या माहितीवर एक दिवसाच्या चर्चेत राहण्यासाठी असे आरोप केले नसते. चर्चेत राहण्यासाठी त्यांनी केलेला हा आरोप आहे. आम्हीदेखील आरोप करु शकतो. पण, आरोपाममध्ये तथ्य आणि सत्य असावे, असे आम्ही मानतो. “आम्हीही प्रकाश आंबेडकर आणि भाजप यांची मिलीभगत आहे , असा आरोप करु शकतो. पण, पुराव्यांशिवाय आम्ही आरोप करीत नाहीत. प्रकाश आंबेडकर यांनीही हे ध्यानात ठेवावे की आपण बाबासाहेब आंबेडकरांचे वारस आहोत. उगाच दिवसभराच्या चर्चेसाठी हा वारसा कलंकीत करु नका. कारण, आम्हीही त्यांचे वैचारिक  वारस आहोत. त्यामुळे खोटे आरोप करणारे  वैचारिक वारस कधीच स्वीकारत नाहीत," असा टोला आ. आव्हाड यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com