Jeetendra Awhad meets Uddhav Thakre again | Sarkarnama

जितेंद्र आव्हाड- उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा खलबते !

प्रशांत बारसिंग
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

 फक्त निमंत्रण देण्यासाठी एक तासाची चर्चा कशासाठी? आणि निवडणुका जवळ येत असताना जितेंद्र आव्हाड- उद्धव ठाकरे  हे दोघे साहित्यावर आणि सांस्कृतिक विषयावर चर्चा करणार काय ?  असा प्रश्न राजकीय वर्तुळात केला जात आहे. 

मुंबई:  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज रविवारी  मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जितेंद्र आव्हाड यांनी महिनाभरात दुसऱ्यांदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने आता राजकीय वर्तुळात वावडया उठल्या आहेत.

लोकसभा आणि विधानसभांचे पडघम वाजण्यास सुरवात झालेली असताना गेल्या महिनाभरातील ही दुसरी भेट आहे . यापूर्वी हे दोघे नेते १२ ऑक्टोबरला भेटले होते .  या भेटी दरम्यान या दोघांमध्ये जवळपास एक तास खलबते  झाल्याची माहिती समोर आली आहे.

 जितेंद्र आव्हाड यांनी आपण पुस्तक प्रकाशनाचे आमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवर गेल्याची माहिती  टिवटरवरून दिली आहे. मात्र, फक्त निमंत्रण देण्यासाठी एक तासाची चर्चा कशासाठी? आणि निवडणुका जवळ येत असताना हे दोघे साहित्यावर आणि सांस्कृतिक विषयावर चर्चा करणार काय ?  असा प्रश्न राजकीय वर्तुळात केला जात आहे. 

भेटीदरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकलेले नाही. ऑक्‍टोबर महिन्यातही जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली होती तेंव्हाही त्यांनी दोघातील ही सदिच्छा भेट असल्याचे म्हंटले होते . त्यामुळे या दोघात राजकीय स्वरूपाची चर्चा आणि संदेशांची देवाणघेवाण सुरु असावी असा तर्क लावला जात आहे . 

 उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना आमदार अनिल परब हे देखील या भेटी दरम्यान उपस्थित होते. जवळपास एक तास या नेत्यांमध्ये चर्चा झाली. दरम्यान, पुस्तक प्रकाशनाचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही दिल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित लेख