jaysingrav gayakwad | Sarkarnama

जयसिंगराव गायकवाड यांची रविवारपासून अभिवादन फेरी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 मार्च 2018

औरंगाबाद : शिवसेनेच्या बालेकिल्यात पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले भाजपचे संभाव्य उमेदवार माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी मतदारसंघ पिंजून काढण्याची तयारी केली आहे त्यासंबंधी त्यांना वरूनच सूचना देण्यात आली असावी असे सांगितले जाते. येत्या चार मार्च पासून जयसिंगराव गायकवाड हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अभिवादन फेरीला सुरूवात करणार आहेत. ऑक्‍टोबर 2018 पर्यंत ही फेरी सुरू राहणार आहे. 

वीस वर्षापासून औरंगाबाद लोकसभेवर फडकत असलेला शिवसेनेचा भगवा उतरवून भाजपचे कमळ फुलवण्याची जोरदार तयारी पक्षाने सुरू केली आहे. सलग चारवेळा विजयी झालेले शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना आव्हान देण्यासाठी भाजपने जयसिंगराव गायकवाड यांच्या रुपाने आपल्या भात्यातील जुने अस्त्र बाहेर काढल्याची चर्चा आहे. 

हरिभाऊ बागडे, भागवत कराड, विजया रहाटकर, एकनाथ जाधव, किशनचंद तनवाणी, पुरुषोत्तम भापकर, उद्योजक मानसिंग पवार, राष्ट्रवादीचे पदवीधरचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण आणि सरतेशेवटी वेरूळच्या जर्नादन स्वामी मठाचे मठाधिपती शांतीगिरी महाराज यांच्या नावाची हवा भाजपकडून गेल्या सहा महिन्यात हेतूपुरस्पर केली गेली. 

भाजपच्या डझनभर इच्छुकांची चर्चा सुरू रहावी हा पक्षाच्या रणनितीचाच एक भाग असल्याचे देखील आता स्पष्ट होऊ लागले आहे. दोनवेळा खासदार व केंद्रात राज्यमंत्री राहिलेल्या जयसिंगराव गायकवाड यांनाच भाजपकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाणार हे त्यांनी चार मार्च ते 21 ऑक्‍टोबर 2018 दरम्यान आयोजित केलेल्या अभिवादन फेरीवरून स्पष्ट झाले आहे. 

अभिवादन फेरी काढण्यापुर्वीच जयसिंगराव गायकवाड यांनी जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. आता त्यापुढचा टप्पा म्हणून चार मार्चपासून सुरू होणाऱ्या जिल्ह्यातील 911 गाव, खेडी व तांड्यावरील अभिवादन फेरीकडे पाहिले जात आहे. 

चार हजार 50 किलोमीटरचा प्रवास, सगळ्या जाती, धर्माच्या लोकांच्या भेटी-गाठी आणि संवाद असे या अभिवादन फेरीचे स्वरूप असणार आहे. 35 दौऱ्यातून संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढण्याचे नियोजन भाजपने केले असून जयसिंगराव गायकवाड या अभिवादन फेरी दरम्यान उपस्थितांना प्रवचनाच्या माध्यमातून साकडे घालणार आहेत. 

एकंदरित जयसिंगराव गायकवाड यांनी सुरु केलेली तयारी ही आगामी लोकसभा निवडणूकीतील उमेदवार म्हणूनच केल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत औरंगाबादेत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे विरूध्द जयसिंगराव गायकवाड अशी लढत पहायला मिळण्याची शक्‍यता आहे. 
 
संबंधित लेख