वीस फेब्रुवारीला भाजपचा झेंडा गाडीला लावून मी मैदानात उतरणार - जयसिंगराव गायकवाड

 वीस फेब्रुवारीला भाजपचा झेंडा गाडीला लावून मी मैदानात उतरणार - जयसिंगराव गायकवाड

औरंगाबाद : माझ्या वाढदिवसानिमित्त चार मार्च रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मला शुभेच्छा द्यायला घरी आले होते. त्यावेळी आमच्यात काय चर्चा झाली हे मी सांगणार नाही, पण येत्या 20 फेब्रुवारीला भाजपचा झेंडा गाडीला लावून मी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास सज्ज असेन असा दावा भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील यांनी सरकारनामाशी बोलतांना व्यक्त केला. 

आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु पंढरपूरच्या जाहीर सभेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना उद्देशून " चौकीदार चोर है ' अशी टीका केली आणि युतीच्या चर्चेला खीळ बसली. केंद्र आणि राज्याच्या सत्तेत असतांना शिवसेना नेतृत्वाकडून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीच री ओढली जावी याबद्दल भाजपमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

या पार्श्‍वभूमीवर 4 मार्च 2018 ते आजतागायत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्‍यात 49 हून अधिक दौरे पुर्ण केलेल्या जयसिंगराव गायकवाड यांच्यांशी संपर्क साधला असता आगामी लोकसभा निवडणूकीत औरंगाबादमधून भाजपचे आपणच उमेदवार असूत असा दावा करत त्यांनी युतीची शक्‍यता फेटाळून लावली. 
जयसिंगराव गायकवाड म्हणाले, चार मार्चनंतर पुढील दोन महिने मतदारसंघाच्या दौऱ्याची आखणी करण्यासाठी मी घालवले आणि तेव्हापासून मी लोकांमध्ये जातोय. सर्व जाती-धर्माच्या लोकांचे मला प्रेम मिळते आहे. 

माझे कधी कुणाशी भांडण, वाद झाला नाही. सगळ्यांना सोबत घेऊन वाटचाल करत असल्यामुळे जनतेचा प्रतिसाद मला मिळतोय. लोकांचे प्रेम आणि आपुलकी हेच माझे गुप्तधन आहे असे मी मानतो. या दौऱ्याच्या निमित्ताने मी ते गुप्तधन गोळा करण्याचे काम करतो आहे. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी किंवा अन्य कुठल्याही राजकीय पक्षात माझे शत्रू नाहीत आणि हीच माझी जमेची बाजू आहे. 

प्रवचानातून प्रचारक घडतात 
सर्वसमान्यांमध्ये उठणारा बसणारा, खेडं असो की शहर सगळ्याच परिस्थितीशी जुळवून घेण्याची शिकवण आणि शिस्त बालपणापासूनच अंगी आहे. त्यामुळे केवळ मत आणि निवडणुकीत विजय मिळवणे एवढाच माझा हेतू नाही. मतदारसंघातील भेटी-गाठी आणि दौऱ्यांना सुरूवात केल्यापासून आतापर्यंत माझे 49 दौरे आणि दोनशे प्रवचन झाली आहेत. या निमित्ताने प्रचार आणि प्रवचनाची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. प्रचारातून मत मिळतील पण प्रवचनातून प्रचारक निर्माण होतात. म्हणून जाईल तिथे प्रवचन देतो, वाड्या, वस्त्या तांडे, झोपडी, शेतात राहतो. सकाळी दौऱ्यावर गेलो आणि संध्याकाळी परत आलो असा माझा दौरा नसतो, तर ठरवलेली गावे पुर्ण झाल्याशिवाय मी घरी परतत नाही. 

खैरेंना घरी बसवायचेय... 
या दौऱ्याच्या निमित्ताने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे लोकांना आता बदल हवा आहे. विद्यमान खासदारांच्या विरोधात शहरी ग्रामीण अशा दोन्ही भागात प्रचंड नाराजी आहे. त्यांना सशक्त पर्याय हवा आहे आणि तो मी ठरू शकतो. तेव्हा यावेळी खैरेंना घरी बसवायचेच या उद्देशाने मैदानात उतरणार असल्याचे जयसिंगराव गायकवाड म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com