Jayendra Sonwane works in a hotel | Sarkarnama

गरीब कुटुंबातला जयेंद्र सोनवणे करतो हॉटेलमध्ये काम 

संतोष गंगवाल
मंगळवार, 24 जुलै 2018

कन्नड तालुक्‍यातील देवगांव रंगारी येथे आज (ता. 24) जयेंद्र उर्फ गुड्डू सोनवणे याने रास्तारोको दरम्यान जुन्या निजामपुलावरून कोरड्या नदीपात्रात उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने त्याला गंभीर दुखापत झाली नाही. 

देवगांव रंगारीः मराठा आरक्षणाच्या आंदोलनात गंगापूरच्या कानडगांव येथील काकासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाल्यानंतर याचे लोण हळूहळू मराठवाड्याच्या अनेक भागात पसरत आहे. कन्नड तालुक्‍यातील देवगांव रंगारी येथे आज (ता. 24) जयेंद्र उर्फ गुड्डू सोनवणे याने रास्तारोको दरम्यान जुन्या निजामपुलावरून कोरड्या नदीपात्रात उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने त्याला गंभीर दुखापत झाली नाही. 

जयेंद्र सोनवणे हा गरीब कुटुंबातला तरूण आहे. त्याचे वडील खाजगी वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करतात तर जयेंद्र हा स्वता चुलत भावाच्या हॉटेलवर काम करतो. त्याची आई दुसऱ्याच्या शेतात जाऊन मोलमजुरी करते. दोन विवाहीत मुक्‍या बहिणी आणि बीएड झालेला भाऊ असे त्याचे कुटुंब आहे. तो अल्पभूधारक असून त्याच्याकडे दोन एकर शेती असल्याचे कळते. 

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात यापुर्वी देखील जयेंद्र सोनवणे याने भाग घेतल्याचे कळते. काकासाहेब शिंदे या तरूणाच्या मृत्यूनंतर आज देवगांवर रंगारीत रास्तारोको करण्यात आला. यावेळी जयेंद्रने देखील त्यात सक्रीय सहभाग घेतला. बराच वेळ आंदोलन सुरू असूनही निवदेन स्वीकारण्यासाठी प्रशासनाचा एकही अधिकारी येत नसल्यामुळे संतापलेल्या जयेंद्रने जवळच असलेल्या निजामपुलावरून नदीपात्र उडी मारली. 

नदीपात्रात पाणी नसल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून त्याच्या पायाचे हाड मोडल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, जखमी जयेंद्र सोनवणे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी देवगांव रंगारी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलकांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख