jaydatta kshirsagar | Sarkarnama

आमदार जयदत्त क्षीरसागर यांची ताकद कायम

दत्ता देशमुख
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

शरद पवारांच्या औरंगाबाद दौऱ्यात पुढे असणारे जयदत्त क्षीरसागर प्रफुल्ल पटेलांच्या पुस्तक प्रकाशनालाही प्रमुख पाहुणे होते, तर महापालिकांच्या स्टार प्रचारकांतही राष्ट्रवादीच्या यादीत त्यांचे नाव होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर कितीही अडथळे आणा वरती आपलेच नाव आहे हे जयदत्त क्षीरसागर अधुन मधुन दाखवतात. 

बीड : तेली समाजातल्या आणि महिला असूनही आपल्या कर्तृत्वाने दिवंगत माजी खासदार केशरबाई क्षीरसागर यांनी क्षीरसागर घराण्याची राज्याच्या राजकीय पटलावर ओळख निर्माण केली. त्यांचे राजकीय वारसदार जयदत्त क्षीरसागर यांनीही राजकारणासह तौलिक महासभेच्या माध्यमातून देशभरात ओळख निर्माण केली. पण, पुतण्याच्या बंडानंतर पक्षांतर्गत विरोधकांनीही डोके वर काढून त्यांना शह देऊन त्यांच्या खच्चीकरणाचे प्रयत्न केले. राजकारणातल्या या चालींमुळे त्यांनी धीर न सोडता इकडे लोकांमध्ये व तिकडे पक्षात कायम संपर्क ठेवून वजन राखत आपण अद्यापही राजकीय तंदुरुस्त असल्याचे दाखवले आहे. 

बीड जिल्ह्याच्या राजकारणात मराठा दिवंगत बाबूराव आडसकर, दिवंगत सुंदरराव सोळंके, दिवंगत श्रीपतराव कदम, माजी मंत्री शिवाजीराव पंडित या मराठा नेत्याचे वर्चस्व एकिकडे, तर तेली समाजासाख्या अल्पसंख्यांक समाजातून, ग्रामीण भागातून आणि एक महिला असूनही जिल्ह्याच्या राजकारणाच्या पटलावर पुढे येऊन या सर्व नेत्यांना टक्कर देण्याची राजकीय किमया दिवंगत नेत्या केशरबाई क्षीरसागरांनी केली. 

जयदत्त क्षीरसागर राजकीय पटलावर आल्यानंतर त्यांनीही पंचायत समिती सभापतीपदापासून उपमंत्री, राज्यमंत्री आणि विविध खात्यांचे कॅबीनेट मंत्री म्हणून काम केले. या काळात त्यांनी दिवंगत नेत्या केशरबाई क्षीरसागर यांनी उभे केलेल्या संस्था, सांभाळलेले कार्यकर्ते यांना बळ दिले. त्यामुळे विरोधकांसह पक्षांतर्गत विरोधकांना जयदत्त क्षीरसागरही बहुतेक वेळप्रसंगी पुरुन उरले. पराभवातही संयम न ढळू देता पक्षातला आपला रुबाब कायम ठेवला 

पण मागच्या काळात त्यांच्याकडून होमपिचकडेच दुर्लक्ष झाले. स्थानिक आघाडी सांभाळणारे त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी हळूहळु आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आणि अगदी पालिका निवडणुकीत काका जयदत्त क्षीरसागर यांनाच आव्हान दिले. त्यामुळे क्षीरसागरांच्या पक्षांतर्गत विरोधक आणि स्पर्धकांना ही आयतीच संधी मिळाली. पक्षांतर्गत विरोधकांनी या संधीचे सोने करण्यासाठी एकिकडे संदीप क्षीरसागरांना बळ द्यायचे आणि दुसरीकडे जयदत्त क्षीरसागरांना अजित पवारांच्या दौऱ्यापासून ठेवणे असो वा जिल्हा संघटनेच्या निवड प्रक्रीयेतून बाजूला ठेवणे असे प्रकार करुन त्यांचे खच्चीकरण करण्याचे डावपेच सुरु आहेत. 

अजित पवार गटाकडून ह्या खेळ्या सुरु असल्या तरी पक्षाध्यक्ष शरद पवार, जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे या पक्षाचे धोरण ठरवणाऱ्या मंडळींच्या यादीत आजही जयदत्त क्षीरसागर यांचेच नाव आघाडीवर दिसते. शरद पवारांच्या औरंगाबाद दौऱ्यात पुढे असणारे जयदत्त क्षीरसागर प्रफुल्ल पटेलांच्या पुस्तक प्रकाशनालाही प्रमुख पाहुणे होते, तर महापालिकांच्या स्टार प्रचारकांतही राष्ट्रवादीच्या यादीत त्यांचे नाव होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर कितीही अडथळे आणा वरती आपलेच नाव आहे हे जयदत्त क्षीरसागर अधुन मधुन दाखवतात. 

तौलिक महासभेचा मजबूत पाया 
जयदत्त क्षीरसागर यांनी राजकारणाबरोबरच तौलिक महासभेच्या माध्यमातून देशभरात आपली ओळख निर्माण केली आहे. तेली समाजाच्या निर्णायक मतांवर आजवर प्रफुल्ल पटेलांचा विजय झाल्याची पक्षाला जाण असणारच त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादीने त्यांना वगळून वेगळा विचार करेल अशी शक्‍यता नाही. तरीही काही घडलेच तर जयदत्त क्षीरसागर तौलिक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने देशपातळीवरच्या नेत्यांशी संपर्क राखून आहेत. 

संबंधित लेख