jaydata kshirsagar beed | Sarkarnama

मराठा आरक्षणाबाबत सरकारची नियत साफ नाही - जयदत्त क्षीरसागर

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 जुलै 2018

बीड : आर्थिक निकषावर आरक्षणाची चर्चा हा नवीन बागुलबुवा असून विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न आहे. याला नवे गाजर किंवा केळे म्हणा असा टोला लगावत मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत या सरकारची नियत साफ नसल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधीमंडळातील उपनेते आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी केला. आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरती थांबविण्याची मागणीही त्यांनी केली. 

बीड : आर्थिक निकषावर आरक्षणाची चर्चा हा नवीन बागुलबुवा असून विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न आहे. याला नवे गाजर किंवा केळे म्हणा असा टोला लगावत मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत या सरकारची नियत साफ नसल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधीमंडळातील उपनेते आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी केला. आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरती थांबविण्याची मागणीही त्यांनी केली. 

मराठा समाजाच्या आरक्षणाला आपला कायम पाठींबा असून आरक्षणाच्या विषयावर आपण सभागृहातही भूमिका मांडलेली असून मुंबईच्या मोर्चातही सहभाग घेतलेला आहे. आपली भूमिका व्यापक असून आपण दिखावा करत नाही असेही जयदत्त क्षीरसागर म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आरक्षणाचा ठोस निर्णय होईपर्यंत मेगा भरती थांबवावी या मागणीसाठी परळी येथे ता. 18 जुलै रोजी सुरु झालेले आंदोलन तेराव्या दिवशीही सुरुच आहे. परळीचे आंदोलन आणि आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी तीव्र आंदोलने होत आहेत. दरम्यान, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन झाले. यामध्ये आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी सहभाग घेऊन आपला आरक्षणाला पाठिंबा दर्शविला. 

श्री. क्षीरसागर म्हणाले, आघाडी सरकारने राणे समितीच्या शिफारशीवर मराठा समाजाला 16 टक्के आणि मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिले. न्यायालयाने स्थगिती देताना कारण विचारले आहे. सुभेदार आणि सरदार असलेला मराठा समाज आता सर्वच बाबतीत पिछाडीवर जात असल्याने आरक्षणाची गरज आहे. सध्याचे सरकार आरक्षणाबाबत जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तामिळनाडूने ज्या पद्धतीने आरक्षण दिले त्या मार्गाने जायला हवे असेही जयदत्त क्षीरसागर म्हणाले. 

अधिवेशनात ठराव घेऊन परिशिष्ट 9 ब मध्ये आरक्षण दिले तर त्यामध्ये न्यायालय दहा वर्षे हस्तक्षेप करत नाही. कोर्टाने आरक्षण थांबवलं म्हणणाऱ्या सरकारने कोर्टाने सांगूनही मुस्लिमांना 5 टक्के शिक्षणात आरक्षण देण्याचे सांगूनही का, दिले जात नाही असा सवाल त्यांनी केला. आरक्षणाबाबत सरकारची नियत साफ नसल्याचा आरोप त्यांनी केला. 

या समाजाचे आपल्यावर मोठे उपकार आहेत. या ऋणातून मुक्त होण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. समाजाने शांततेत लाखोंचे मोर्चे काढले, त्याची अंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. मात्र, संयमाला मर्यादा असते, हातात टाळ - मृदंग घेऊनही प्रश्‍न सुटत नसल्याने आंदोलनांना हिंसक वळण भेटत आहे. मात्र, आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले. 

आंदोलनात आज सहावा बळी गेला आहे. बळी देऊन बळी देऊन घरचे छत्र हिरावू नका, बळी देऊन परिस्थितीकडे पाठ फिरविणे ही छत्रपतींची शिकवण नसल्याचेही ते म्हणाले. धनगर आरक्षणाच्या निर्णयावर हे सरकार पहिल्या आठ दिवसांत सही करणार होते. मात्र, शाई संपली का वाळली असा टोलाही त्यांनी लगावला. कुठल्या जातीत जन्माला येणं आपल्या हाती नाही. माझ्या ओबीसी असण्याबद्दल आणि समाजाचा मेळावा घेण्याबद्दल बोलणारे आता कुठे गेले आहेत, दिसत नाहीत, देशात आहेत की परदेशात असा टोलाही त्यांनी लगावला. समाजाचे आरक्षणाचे ध्येय गाठण्यासाठी आपण त्यांच्या सोबत आहोत. हा लढा अंतिम टप्प्यात असल्याने मागे हाटून भागणार नाही असे आवाहन त्यांनी समाजाला केले. 

राजीनाम्यांनी व भावनेच्या भरात प्रश्न सुटणार नाही. राजीनामे दिले तर उद्या विधानसभेत ठराव मांडल्यानंतर मत कोण देणार असे सांगून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांत व माथाडी कामगारमध्ये 90 टक्के मराठा समाज असल्याचे जयदत्त क्षीरसागर म्हणाले. यानंतर आंदोलनात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी आमदार बदामराव पंडित, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, दिलीप गोरे, दिनकर कदम, सुभाष सपकाळ, विलास बडगे उपस्थित होते. 

संबंधित लेख