प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची पहिली परीक्षा सांगलीत

कर्नाटकनंतर होणारी ही निवडणूक भाजपसाठी फारच प्रतिष्ठेची असेल तर वर्षानुवर्षे आपल्या ताब्यात अलसेलेली ही मालिका वाचविण्यासाठी कॉंग्रेसलाही शर्थ करावी लागेल. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी तर राज्यात संदेश देण्यासाठी ही मोठी संधी असेल!
जयंत पाटील
जयंत पाटील

सांगली : सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीचे मैदान येत्या एक ऑगस्टला असेल. या निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता आजपासूनच जाहीर झाली आहे. चार जुलैपासून निवडणुकीची प्रक्रिया सूरु होईल. तीन ऑगस्ट मतमोजणी असेल.

कर्नाटकनंतर होणारी ही निवडणूक भाजपसाठी फारच प्रतिष्ठेची असेल तर वर्षानुवर्षे आपल्या ताब्यात अलसेलेली ही मालिका वाचविण्यासाठी कॉंग्रेसलाही शर्थ करावी लागेल. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी तर राज्यात संदेश देण्यासाठी ही मोठी संधी असेल!

जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक त्यांच्या नेतृत्त्वाखाली लढविली जात आहे. काही दिवस आधी विधान परिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे आता जयंतरावांच्या घराच्या मैदानावरच राष्ट्रवादीला अभ्यास करून उतरावे लागणार आहे.

 
आगामी लोकसभा निवडणुकी आधीची ही सर्वात मोठी निवडणूक असल्याने या निवडणुकीतून राजकीय वातावरणाचा कल आजमावला जाणार आहे. निवडणुकीसाठी सभागृहातील विद्यमान सत्ताधारी कॉंग्रेस आणि विरोधक राष्ट्रवादीत आघाडीचे स्पष्ट संकेत आहेत. विरोधात भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. 

सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांची एकत्रित अशी महापालिका 9 फेब्रुवारी 1998 रोजी झाली. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजप युतीच्या सत्ताकाळात पालकमंत्री अण्णा डांगे यांच्या आग्रहाने स्थापन झालेल्या या महापालिकेवर प्रारंभपासून कॉंग्रेस आणि पुढे राष्ट्रवादीचीच सत्ता आहे. सध्या कॉंग्रेसची सुमारे 45 सदस्यांसह महापालिकेत सत्ता असून जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीची यापुर्वी सत्ता होती.

महाआघाडीचे बारा वाजल्यानंतर 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे दिवंगत नेते मदन पाटील, आणि पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने बहुमत मिळवत सत्ता प्राप्त केली होती. आता हे दोन्हीही नेते नाहीत. पण त्यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हा स्वच्छ चेहरा सांगलीकरांना साद घालून गेला होता. आता गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून विद्यमान सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकाच्या भूमिकेत असलेले कॉंग्रेस-राष्ट्रवादी आता आघाडीच्या मूडमध्ये आहेत. जयंतराव यासाठी आग्रही आहेत." 

दुसरीकडे भाजपने स्वबळावर महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून जोरदार तयारी सुरु केली आहे. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला जिल्ह्यात चार आमदारासंह खासदारांचे बळ मिळाले आहे. या जोरावर जिल्हा परिषदेची सत्ताही पहिल्यांदाच भाजपला मिळाली. त्यामुळे महापालिकेसाठी ते जोरदार प्रयत्न करणार हे स्पष्ट आहे. 

कॉंग्रेसपुढे आपली पडझड रोखणे मोठे आव्हान असेल कारण एककाळ संपूर्ण जिल्हा कवेत असलेल्या कॉंग्रेसचा आता फक्‍त एक आमदार येथे राहिला आहे. नुकतेच आजी-माजी आठ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपची मदार आयरामांवरच अधिक असेल. तसेच सत्ताधारी कॉंग्रेसच्या नाराजीचा फायदाही त्यांना मिळू शकतो. कॉंग्रेसपुढे प्रचारात स्थानिक मुद्दे अडचणीचे असतील. दोन्ही कॉंग्रेसची आघाडीचे कोडेही आजून सुटलेले नाही. राष्ट्रवादीने कॉंग्रेसकडे 38 प्रभाग मागितले आहेत. आघाडी केली तर आपल्यातील कार्यकर्ते फूटून भाजपमध्ये जातील, अशी भिती कॉंग्रेसला आहे. दुसऱ्याबाजूला भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याची काही शक्‍यता येथे दिसत नाही. अशी एकंदर राजकीय युध्दभूमी सांगलीतील चित्र आहे. अर्थात सांगलीची निवडणूक सर्वांसाठी आमागी निवडणुकांसाठी रंगीत तालीमच असेल! 
.......... 

निवडणूक एका नजरेत 
एकूण प्रभाग 20 
एकूण नगरसेवक 78 
मतदारसंख्या-4 लाख 23 हजार 
मतदान -1 ऑगस्ट 
मतमोजणी 3 ऑगस्ट 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com