विश्वजित,"" तुला त्रास होईल असे पाप माझ्याकडून कधीही होणार नाही;'' जयंत पाटलांचे आश्‍वासन 

 विश्वजित,"" तुला त्रास होईल असे पाप माझ्याकडून कधीही होणार नाही;'' जयंत पाटलांचे आश्‍वासन 

सांगली ः पतंगराव कदम मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्राचे आजचे चित्र वेगळे दिसले असते. त्यांची कामाची अखंड धडाडी महाराष्ट्राच्या हितासाठी होती अशा भावना आमदार जयंत पाटील यांनी आज व्यक्त केल्या. विश्‍वजीत, "" मी तुला शब्द देतो की तुझ्या पाठीशी आम्ही सदैव राहू. तुला त्रास होईल असे पाप माझ्याकडून कधीही होणार नाही.'' हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. 

विविध क्षेत्रातील समस्त सांगलीकरांनी आज कदमसाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. येथील भावे नाट्यगृहात साहेबांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सामान्य नागरिकांपासून राजकीय व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, धाडसी राजकारणी, क्रीडा संघटक, जिव्हाळा जपणारा नेता, संवेदनशील दातृत्वाचा झरा अशा विविध रुपातील पतंगरावांचे दर्शनच विविध मान्यवरांनी आपल्या जीवनभराच्या आठवणीतून उभे केले. 

सुमारे पस्तीस वर्षाच्या एकत्रित राजकीय वाटचालीवर भाष्य करताना जयंतरावांनी कॉंग्रेस आघाडी सरकारमधील जिल्ह्याच्या त्रिकुट मंत्री कालखंडाला जणू उजाळा दिला. पतंगराव म्हणजे आकाशाला गवसणी घालणारा नेता होता हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून स्पष्ट व्हायचे. एखादी शाळा काढतेवेळीच भारती विद्यपीठ असे नाव द्यायचे धाडस पतंगरावच करु शकतात. 

त्यांनी मला सांगितलेले एक वाक्‍य मी सदैव स्मरणात ठेवेन. ते मला म्हणायचे ""जयंत घर सोडू नको'' त्यातून आपल्या परिसराची मातीची जाण सतत ठेवली पाहिजे. मंत्रीमंडळात सिंचन योजनांची बिले भरण्याचा जेव्हा जेव्हा विषय यायचा तेव्हा आमचे सेटींग मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्याही लक्षात यायचे. तेच स्वतःहून म्हणायचे, हं आता तुम्हाला काय करायचे ते तुम्ही तिघेच बसून करा. आर.आर. आणि माझ्यामध्ये बसलेल्या पतंगरावांची फिरकी घ्यायच्या हेतूने म्हणायचो," साहेब तुम्ही आमच्या पक्षात असता तर...मुख्यमंत्री झाला असता.' त्यावर ते म्हणायचे, ""आरे मी आणि माझा पक्ष बघून घेतो. तुम्ही त्यात लक्ष घालायचे कारण नाही.'' कॉंग्रेस पक्षावरील त्यांची अविचल निष्ठा कायम होती. पलूस तालुका करण्यासाठी त्यांनी माझ्या कार्यालयात चार तास तळ ठोकला होता. फाईल क्‍लिअर करूनच ते उठले. जाताना त्यांनी वित्तमंत्री म्हणून तू योग्य वागलास असाही शेरा मारायला ते विसरले नाहीत. महापूराच्या काळात उंबरठ्याच्या आत पाणी आले की माणसी एक हजार रुपये द्यायचा निर्णय त्यांनी ज्या गतीने रेटला ते पाहून सारे थक्क झाले. त्यांची ही धडाडी महाराष्ट्र हिताची होती. मुख्यमंत्री झाले म्हणजेच सारे झाले असे नाही हे खरेच. मात्र ते मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे दिसले असते.'' 

खासदार संजय पाटील म्हणाले,"" पतंगरावांच्या निधनाने जिल्ह्याची आणि राज्याची मोठी हानी झाली आहे. जिल्ह्याचे पालकत्व घेतलेला हा नेता आपल्यात नाही यावर विश्‍वासच बसत नाही.'' 

खासदार राजू शेट्टी म्हणाले,"" ऊस आंदोलनाच्या निमित्ताने त्यांच्याशी सतत संघर्ष झाला मात्र त्यांनी कधीही तो मनान न ठेवता दिलदारपणे आम्ही सांगितलेली सर्व विकासकामांना मदत केली. 2002 च्या दरम्यानचे आंदोलन असावे. आम्हाला त्यांनी कोल्हापूरात चर्चेला बोलवले. आमचे सर्व कार्यकर्ते अटकेत होते. त्यांना सोडण्याची मी अट घातली. सारे कार्यकर्ते बाहेर आले आणि पसार झाले. आंदोलन पुढे वाढत गेले. मात्र आमच्या या कृतीचा त्यांनी मनात राग ठेवला नाही. एकदा त्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन झाले. मला फोन आला. म्हणाले,राजू अरे आंदोलने अशी व्यक्तीगत पातळीवर कधी न्यायची नसतात. त्यांनी सांगितलेला तो धडा मी घेतला आणि त्यानंतर मी कोणतेही आंदोलन व्यक्तीगत पातळीवर नेले नाही. खुल्या मनाचा हा दिलदार नेता होता. मोठ्या संघर्षातून त्यांनी लाखो लोकांच्या हिताचा कारभार केला. 

यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे , प्रा.जे.एफ.पाटील, प्रा.तारा भवाळकर ,जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलिप पाटील ,माजी आमदार दिनकर पाटील, पृथ्वीराज पवार 
भाजप नेत्या नीता केळकर आदी मान्यवरांनी पतंगराव कदमसाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. 

ते पाप मी करणार नाही... 
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आज पतंगरावांच्या आठवणी सांगताना राजारामबापूंच्या पश्‍चात त्यांनी दिलेल्या आधाराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व विश्‍वजीत यांना उद्देशून म्हणाले, "" मी तुला शब्द देतो की तुझ्या पाठीशी आम्ही सदैव राहू. तुला त्रास होईल असे पाप माझ्याकडून कधीही होणार नाही.'' पतंगरावांनी टंचाई निधीतून सिंचन योजनांना ज्या सहजतेने निधी मिळवून दिला ते चित्र आज दिसत नाही अशी खंतही श्री पाटील यांनी आज व्यक्त केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com