तटकरेंना खासदार तर; जगतापांना आमदार करण्याची जबाबदारी जयंत पाटलांवर!

तटकरेंना खासदार तर; जगतापांना आमदार करण्याची जबाबदारी जयंत पाटलांवर!

अलिबाग : शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना रायगडमधून खासदार तर काॅंग्रेसचे माणिक जगताप यांना महाडमधून आमदार करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. एवढेच नाही तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले तर अलिबागची जागा ही काॅंग्रेससाठी सोडण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे.

या संदर्भात सुनील तटकरे आणि पाटील यांनी अलिबागमध्ये एकत्रित पत्रकार परिषद घेतली. काॅंग्रेसचे माजी मंत्री रवीशेठ पाटील हे काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकापच्या युतीला विरोध करत भाजपमध्ये गेले. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी पुन्हा ही युती कायम राहणार असल्याचा दावा केला. 

राष्ट्रीय पातळीवर धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे ही आमची भूमिका आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातही राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि काँग्रेस अशी आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. यासाठी जागा वाटपातील मतभेद टोकाला जाऊ देणार नाही. शरद पवार यांचा शब्द अंतिम राहिल. त्यांनी अलिबागची जागा काँग्रेससाठी सोडण्याचा आदेश दिला, तर तो पाळला जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

रायगडमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने आमच्यासोबत यावे, यासाठी आम्ही प्रयत्न केले पण काँग्रेस नेत्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. तरीही जिल्हा नियोजन मंडळात आम्ही काँग्रेसला प्रतिनिधीत्व दिले. शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्राप्त होणारा निधी दिला जात आहे. त्यामुळे आघाडीचा धर्म आम्ही पाळत आहोत, महाडचे पुढील आमदार माणिक जगताप असतील, त्यासाठी जे सहकार्य लागेल ते शेकाप आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून केले जाईल, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

आपली राजकीय फसवणूक केल्‍याचा आरोप रवीशेठ पाटील यांनी केला होता.  मात्र आपण कुणाचीही राजकीय कोंडी केली नसल्‍याचे सुनील तटकरे यांनी या वेळी स्पष्ट केले. 1999 पासून काँग्रेस – राष्‍ट्रवादी यांची आघाडी होती. तेव्‍हापासून सातत्‍याने मी आणि आमच्‍या पक्षाने काँग्रेसला सर्वतोपरी सहकार्य केले. आघाडीचा धर्म पाळण्‍याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मी काही लोकांचा वापर करून घेतल्‍याचा आरोप केला जातो तो तद्दन खोटा असल्‍याचे तटकरे यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com