jayant patil selfie result issue | Sarkarnama

जयंत पाटलांच्या सेल्फीचा पॉझिटिव्ह रिझल्ट ! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पेठ-सांगली रस्त्यावर "सेल्फी वुईथ खड्डा' काढून तो फेसबुकवर पोस्ट केला होता. त्यानंतर यंत्रणा अधिक गतीमान झाली.

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पेठ-सांगली रस्त्यावर "सेल्फी वुईथ खड्डा' काढून तो फेसबुकवर पोस्ट केला होता. त्यानंतर यंत्रणा अधिक गतीमान झाली. खासदार संजय पाटील यांनी आज मुंबईत तातडीची बैठक घेत कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले. त्यामुळे आज खड्डे भरण्याच्या कामाला सुरवात झाली. 

जयंतरावांनी या सेल्फीसोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे या कामाकडे लक्ष होते. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणतर्फे सुरु असलेल्या रस्ते विकास कामांसाठी मुंबईतील बैठकीत खासदारांनी प्रामुख्याने या रस्त्याच्या कामाविषयी सूचना केली. केंद्रीय रस्ते विकास विशेषकार्य अधिकारी सुधीर देउळगांवकर उपस्थित होते. 

विटा ते मिरज; पेठ नाका ते सांगली रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आला आहे. त्याची ताबडतोब दुरुस्ती करा, मिरज शहरातील रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती करा, असे आदेश दिले. गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग, मनमाड-चिकोडी राष्ट्रीय महामार्ग, रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा घेतला.  

दरम्यान सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांचे आंदोलन सुरुच राहील असा इशारा दिला. समितीने जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांची भेट घेऊन रस्त्याचे काम सुरु करावे अशी आग्रही मागणी केली होती. बांधकाम विभागाची खरडपट्टी केली होती. तत्काळ काम सुरु करा, असे आदेश दिले होते. त्यानंतर यंत्रणा हालली. जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत नेत्यांनीही अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली होती. 

संबंधित लेख