jayant patil on raju shetti | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

जयंतरावांकडून शेट्टींचे कौतुक सदाभाऊंवर टीकास्त्र 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 मे 2017

इस्लामपुरात रविवारी झालेल्या या मेळाव्यावर आता कवित्व सुरू झाले आहे. याच मेळाव्यात सर्वांनी जयंतरावांवर जोरदार टीका केली होती. जयंत पाटील यांचे नाव न घेता सदाभाऊंनी त्यांचा कट्टापा असा उल्लेख केला आणि ते देखील आपल्या घुसण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यापासून सावध राहा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनीही जयंतरावाना लक्ष्य केले होते. यावर थेट प्रसारमाध्यमांकडे न जाता जयंतरावांनी फेसबुकवरून मोजक्‍याच शब्दांत मेळाव्याची खिल्ली उडवली आहे. 

इस्लामपूर : " नेता उन्हातान्हात आत्मक्‍लेशात... कार्यकर्ता मात्र दुसऱ्या पक्षातील माणसं तिसऱ्या पक्षात ढकलण्यात कार्यरत ! अजब आहे !! हेच का ते अच्छे दिन ?'' ही फेसबुकवरील आमदार जयंत पाटील यांची पोस्ट आहे. येथे शब्दांचे अर्थ सूज्ञांनी स्वत:च लावून समजून घ्यायचे आहेत. विशेष म्हणजे या पोस्टसोबत राजू शेट्टींचा फोटो त्यांनी शेअर केल्याने एकाचे कौतुक तर दुसऱ्याला शालजोडीतून आहेर त्यांनी केला आहे. 

जयंतरावांच्या या पोस्टवरील शब्दांचे अर्थ शोधायचे म्हणजे नेता म्हणजे राजू शेट्टी आणि कार्यकर्ता म्हणजे सदाभाऊ ! इस्लामपुरातील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या भाजप पुरस्कृत शेतकरी मेळाव्यात नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि वैभव शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यानी भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा घडवून आणण्याचे सर्व नियोजन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे होते. अर्थात या सर्व मेळाव्यावर टिपणी करताना जयंतराव म्हणताहेत नेता म्हणजे शेट्टी हे उन्हातान्हात आत्मक्‍लेश आंदोलनात आहेत तर दुसरीकडे (इस्लामपुरात) कार्यकर्ता म्हणजे सदाभाऊ दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते (म्हणजे राष्ट्रवादीतील) तिसऱ्या पक्षात (म्हणजे भाजपमध्ये) ढकलण्यात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे खासदार राजू शेट्टी यांच्या आत्मक्‍लेश यात्रेचे समर्थन करीत त्यांच्या आंदोलनाची व्हिडीओ क्‍लीप जयंतरावांनी शेअर केली आहे. याबाबत वाळवा तालुक्‍यात आश्‍चर्य व्यक्त होत आहे. एक काळ राजू शेट्टी शेतकऱ्यांची फसवणूक करतात, असा आरोप करणाऱ्या जयंतरावांना एका रात्रीत आत्मक्‍लेश आंदोलनाचा आणि शेट्टींचा पुळका का आला असा सवाल स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पडल्याने ते बुचकळ्यात पडले आहेत. अर्थातच शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ही राजनीती यामागे दिसते, हे कोणी सांगायची गरज नाही! अर्थात या पोस्टला 684 जणांनी ही पोस्ट लाईक करुन सुमारे 65 जणांनी ती त्यांच्या फेसबुक खात्यावर शेअर केली आहे. 42 जणांनी कॉमेंट केल्या आहेत. 

 

संबंधित लेख