Jayant Patil NCP takes government to task | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

शेतकऱ्यांच्या हातात पाटी देवून पंचनामे करण्याचीही पध्दत आहे का ?  - जयंत पाटील 

ब्रह्मा चट्टे : सरकारनामा न्यूज ब्यूरो
बुधवार, 7 मार्च 2018

गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या हातात पाटी देवून पंचनामे करण्यात आले ही पंचनाम्याची पध्दत आहे का ? आपल्या राज्यात शेतकऱ्यांशी असा व्यवहार होत असेल तर या सरकारची शेतकऱ्यांबाबत काय मानसिकता आहे हे दिसून येते.

-जयंत पाटील

मुंबई  : " गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या हातात पाटी देवून पंचनामे करण्यात आले ही पंचनाम्याची पध्दत आहे का ? आपल्या राज्यात शेतकऱ्यांशी असा व्यवहार होत असेल तर या सरकारची शेतकऱ्यांबाबत काय मानसिकता आहे हे दिसून येते, "असा टोला राष्ट्रवादी काँग्रसचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी सरकारला लगावला. विधानसभेमध्ये नियम २९३ अन्वये उपस्थीत केलेल्या प्रस्तावावर जयंत पाटील बोलत होते. 

शेतकऱ्यांच्या अवस्थेवर टिप्पणी करत सरकारला धारेवर धरत जयंत पाटील म्हणाले, " राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला वारंवार सांगूनही हे सरकार कोडगे झाले आहे. शेतकऱ्यांना सरकारने ठोस अशी मदत करावी अशी मागणी करत आहोत परंतु हे गेंड्याच्या कातडीचे बनलेले सरकार याकडे लक्षच द्यायला तयार नाही. देशाचे पिकांचे विक्रमी उत्पादन झाले आहे. आयातीवर निर्बंध घातले जावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे."

" मात्र आयात वाढली आहे. शेतीमालाला भाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या हातात कमी पैसे मिळत आहेत. शेतकऱ्यांसाठी यांनी केंद्रे खुली केली नाही याचा फायदा व्यापाऱ्यांना झाला. तूरीला कवडीमोल भाव दिला जात आहे. ५२ टक्के शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. गारपीटीने शेतकऱ्यांना झोडपले आहे. आज महागाई वाढली आहे. पेट्रोलचे, डिझेलचे दर वाढले आहेत. मात्र हे सरकार शेतकऱ्यांना त्यापध्दतीने मदत देत नाही. आम्ही शेतकऱ्यांचा विचार करायचो मात्र आताच्या सरकारमध्ये आणि मागच्या सरकारमध्ये जमीन आस्मानचा फरक आहे ," असा चिमटाही पाटील यांनी काढला. 

जयंत पाटील पुढे म्हणाले, " शेतकऱ्यांना विशेष पॅकेज दिले पाहिजे.  कोरडवाहू शेतीसाठी २५ हजार हेक्टरी तर बागायतदार शेतीसाठी ५० हजार हेक्टरी मदत दयावी . वीजेचे प्रश्न अजुनही सुटलेला नाही आज तर शेतकऱ्यांना नोटीसीही दिल्या जात आहे. राज्याचे कृषी खाते बेजबाबदारपणे काम करत आहे. हा कृषी खात्याचा अकार्यक्षम कारभाराचा नमुना आहे. " 

"किटकनाशकामुळे ५५ शेतकरी दगावले. ५०० शेतकरी जखमी झाले. त्यांना फक्त ५ हजार मदत दिली. एका शेतकऱ्याने याचिका दाखल केली. त्यामुळे इच्छा नसताना ४ लाख मदत दयावी लागली. बोंडअळीसंदर्भात अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफीची मदत मिळालेली नाही. सरकारने बियाणे कंपनीकडून पैसे वसूल करु असे सरकारने सांगितले होते. परंतु पैसे द्यायला कंपन्या वेड्या आहेत का ? कंपन्या गेल्या कोर्टात आणि तुम्ही हात वर केले आहेत. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन द्या आणि शेतकऱ्यांना दुप्पटीने मदत करा," अशी मागणीही पाटील यांनी वेळी बोलताना केली.

संबंधित लेख