'स्वाभिमानी'ला आमच्यातीलच काहींचा विरोध : जयंत पाटील
प्रकाश आंबेडकरदेखील आघाडीत सहभागी होतील.
इस्लामपूर (सांगली) : कॉंग्रेससोबतच्या बैठकीत 12 ऑक्टोबरला स्वाभिमानी पक्षाच्या मागण्यांवर चर्चा व निर्णय होईल. 'स्वाभिमानी'ला आमच्यातीलच काहींचा विरोध आहे, त्यांच्याही भावना विचारात घेऊ, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी केले.
प्रकाश आंबेडकरदेखील आघाडीत सहभागी होतील. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे भाजपमध्ये गेलेल्यांची दुय्यम वागणुकीमुळे घरवापसी होईल, असेही ते म्हणाले.
'पुढचा मुख्यमंत्री मीच' या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास ढळत चाललाय. हे लक्षात आल्यानेच मुख्यमंत्री असे बोलत असावेत, अशी टीकाही त्यांनी केली. सरकारच्या निषेधार्थ येथे निघालेल्या मोर्चानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 'राष्ट्रवादी'च्या सभांचे पोलिसांकडून होणारे चित्रीकरण कशासाठी? यावर 'आम्हाला मिळणारा प्रतिसाद आणि व्यक्त होणारा संताप जाणून घेण्यासाठी गृहमंत्र्यांचा तसा आदेश असावा', असा टोला त्यांनी लगावला.