jayant patil about sangli loksabha | Sarkarnama

सांगलीत आमच्याकडे 'बलाढ्य उमेदवार', मात्र इतक्‍यात नाव जाहीर करणार नाही!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

ते नाव समोर आले की काय अवस्था होईल, हे तेंव्हाच कळेल.

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचा उमेदवार कोण असेल हे राष्ट्रवादीला विचारूनच ठरेल. देशात आघाडी करताना ते धोरण ठरलेले आहे. येथे बलाढ्य उमेदवार आघाडीकडे असून तो कोण, हे योग्यवेळी जाहीर केले जाईल, अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केली. 

तासगाव येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना श्री. पाटील यांनी "आघाडीकडे बलाढ्य उमेदवार आहे, जो भाजपची पळताभूई थोडी करेल', असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाने जिल्हाभर चर्चा सुरु झाली. आता कॉंग्रेसकडे असा बलाढ्य उमेदवार कोण, यावर रान उठले आहे. या पार्श्‍वभूमीवर श्री. पाटील यांच्या मनी काय दडलयं, याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ""इतक्‍यात नाव जाहीर करणे घाईचे होईल. आताच हवा कशाला काढायची. ते नाव समोर आले की काय अवस्था होईल, हे तेंव्हाच कळेल. ही निवडणूक आम्ही अतिशय गांभिर्याने घेतली आहे. राज्यात एकमेकांना विचारूनच आघाडीचे उमेदवार ठरवले जातील. सांगलीत तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला विचारूनच उमेदवार ठरवावा लागेल.'' 

आघाडी पूर्णपणे नवा चेहरा देणार आहे का, या प्रश्‍नावर त्यांना "जरा दम धरा', असे सांगत सस्पेन्स कायम ठेवला. त्यांच्या भूमिकेतून सांगली लोकसभा मतदार संघ कॉंग्रेसकडे असला तरी राष्ट्रवादीचा पासंग तितकाच महत्वाचा ठरणार असल्याचे संकेत दिले आहेत. 

संबंधित लेख