jayant patil about ratnagiri sindhudurg loksabha seat | Sarkarnama

राणेंचा विषयच नाही, 'रत्नागिरी-सिंधुदुर्ग'साठी राष्ट्रवादीचा पाठिंबा काँग्रेसलाच! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

भास्कर जाधव विरूद्ध सुनील तटकरे वाद आता मिटल्याचे पाटील यांनी सांगितले. 

चिपळूण (रत्नागिरी) : रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस पाठींबा देईल. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाला पाठींबा देण्याचा विषय पक्षीयस्तरावर चर्चेतसुद्धा नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भास्कर जाधव विरूद्ध सुनील तटकरे वाद आता मिटल्याचे पाटील यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांच्या चिपळूणातील संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पाटील आज चिपळूणात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले, लोकसभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. रायगड लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. पक्षाने सुनील तटकरे यांचे नाव निश्‍चित केले आहे. या मतदार संघातून राष्ट्रवादीतर्फे भास्कर जाधवही इच्छूक होते. त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. परंतू पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जाधव व इतर नेत्यांना विश्‍वासात घेवून तटकरे यांचे नाव निश्‍चित केले. मागील निवडणूकीत मोदी लाट असताना सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांच्याशी संघर्ष केला. त्यांचा काठावर पराभव झाल्यामुळे पुन्हा तटकरेंची उमेदवारी निश्‍चित झाली आहे. जाधव आणि तटकरे यांच्यातील वादही पक्षाने मिटवला आहे. त्यामुळे हे दोघे लोकसभेसाठी एकत्र काम करतील. मागील निवडणूकीत शेकापच्या उमेदवाराने दिड लाख मते घेतली होती. या निवडणूकीत शेकापचाही तटकरेंना पाठींबा असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. 

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याकडे घेईल आणि स्वाभिमान पक्षाला पाठींबा देईल, अशी राजकीय चर्चा मध्यंतरी सुरू होती. पाटील यांनी त्याचा इन्कार केला. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख