jankar and bjp campaign | Sarkarnama

एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र कधी मिळणार ते सांगा : जानकरांना सभेत थेट प्रश्‍न !

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 एप्रिल 2019

धनगर समाजाच्या मतांवर प्रभाव पाडून ती आपल्या पारड्यात पडावीत यासाठी भाजपकडून मंत्री महादेव जानकर यांना जिल्ह्यात सभांसाठी आणले जात आहे. 

माजलगाव (जि. बीड) : महायुतीच्या सरकारने केलेल्या कामांचा महादेव जानकर उहापोह करत असतानाच, एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र कधी मिळणार असा थेट प्रश्न एका वृद्ध मतदाराने उठून त्यांना विचारला. त्यावर काही वेळ गडबडलेल्या जानकरांनी वेळ मारुन नेली. जिल्ह्यात धनगर समाजाच्या मतांची मोठी संख्या आहे. यापूर्वी समाजाने आपली एकगठ्ठा मते भाजपच्या पारड्यात टाकल्याचा इतिहास आहे. यावेळी धनगर समाजाची आरक्षणाच्या मुद्द्यांवरुन नाराजी आहे. त्यामुळे या समाजावर प्रभाव पाडून ती मते पुन्हा आपल्या पारड्यात पडावीत यासाठी भाजपकडून महादेव जानकर यांना सभांसाठी बोलविण्यात येत आहे. 

पंकजा मुंडे यांच्यासह सभेला आलेल्या जानकरांचे भाषण सोमवारच्या सभेत सुरु झाले. त्यांनी विद्यमान सरकारच्या कामांचा उहापोह सुरु केला. यावर एक 65 वर्षीय वृद्ध मतदार उठला आणि धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचे आणि त्यात समावेश झालेल्या प्रमाणपत्राचे काय असा थेट प्रश्न जानकर यांना केला. यावर, जानकर यांनी आता याच विषयावरच सविस्तर बोलतो. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न यापूर्वीच्या सरकारने 60 वर्षांपासून प्रलंबीत ठेवला. मात्र, या सरकारने एसटी प्रवर्गाला धक्का न लावता स्वतंत्र सवलती सुरु केल्या आहे. एसटी प्रवर्गासाठी असलेल्या सुविधा मिळत आहेत. समाजाचे 60 उमेदवार जिल्हाधिकारी झाले आहेत. आगामी काळात समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

संबंधित लेख