Jangaon Suresh Jain again Active in Politics | Sarkarnama

जळगाव बाजार समिती सभापतीवर अविश्‍वास प्रस्ताव : सुरेशदादा जैन राजकारणात सक्रिय

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश नारखेडे यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव आज दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन हे राजकारणात सक्रिय झाले असून त्यांनी बाजार समितीत भाजपच्या खडसे गटावर पहिलाच डाव टाकला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

जळगाव : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश नारखेडे यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव आज दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन हे राजकारणात सक्रिय झाले असून त्यांनी बाजार समितीत भाजपच्या खडसे गटावर पहिलाच डाव टाकला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची संयुक्त सत्ता आहे. सभापती भाजपच्या खडसे गटाचे आहेत. तर उपसभापती कैलास चौधरी हे शिवसेनेचे आहेत. सत्ता स्थापनेपासून त्यांच्यात वाद आहेत. अखेर आज शिवसेनेच्या सुरेशदादा जैन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या संचालक गटाने सभापती प्रकाश नारखेडे यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला. बाजार समितीत 18 संचालक आहेत, त्या पैकी एक संचालक मयत झाले आहेत. आता सतरा संचालक असून त्यापैकी तेरा संचालकांनी अविश्‍वास प्रस्ताव आज जिल्हाधिकारी किशोरराजे निबांळकर यांच्याकडे दाखल केला आहे.

त्यामुळे जळगाव जिल्ह्यात सुरेशदादा जैन सक्रीय झाले असून त्याची सुरूवात बाजार समितीपासून झाली आहे. जैन यांच्यावर घरकुलाचा आरोप होण्यापूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली बाजार समिती, जिल्हा बॅंक, त्यांच्या नेतृत्वाखाली ताब्यात होती. मात्र ते कारागृहात गेल्यानंतर झालेल्या निवडणुकीत बाजार समिती, जिल्हा बॅंकेवर भाजपचे एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व निर्माण झाले होते.कारागृहातून जामीनावर सुटल्यानंतर गेल्या वर्षभरापासून जैन यांनी राजकारणात कोणतीही सक्रीयता घेतली नाही. मात्र, प्रथमच त्यांनी बाजार समिती सत्ता काबीज करण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्यांच्या समवेत शिवसेनेचे उपनेते सहकाराज्यमंत्री गुलाबराव पाटीलही आहेतच.

बाजार समितीचे सभापती प्रकाश नारखेडे हे खडसे यांचे कट्टर समर्थक आहेत. 17 पैकी केवळ चार सदस्यच आता भाजपकडे उरले आहेत. अविश्‍वास ठराव दाखल करण्यापूर्वी बाजार समितीचे तेरा संचालक जैन यांच्या शिवाजी नगरातील निवासस्थानी जमले होते. त्या ठिकाणाहून ते जिल्हाधिकारी कार्यालयात अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या समवेत जैन यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे नुकतेच महापौर झालेले ललीत कोल्हे, तसेच माजी उपमहापौर ललीत कोल्हे होते.

अविश्‍वास दाखल करणारे संचालक पुढीलप्रमाणे भरत हिमंत बोरसे, लक्ष्मण गंगाराम पाटील, मनोहर भास्कर पाटील, सुरेश शामराव पाटील, अनिल बारसु भोळे, प्रशांत अरविंद पाटील, वसंत राजाराम भालेराव, कैलास छगन चौधरी, सिंधूबाई मुरलीधर पाटील, यमुनाबाई इंद्रराज सपकाळे, शशिकांत बियाणी, नितीन बाळकृष्ण बेहेडे, सरलाबाई मच्छिंद्र पाटील तर भाजपच्या खडसे गटाकडे राहिलेले चार सभासद असे, प्रकाश नारखेडे,प्रभाकर पवार, प्रभाकर सोनवणे, विमलबाई भंगाळे.

बाजार समितीचे उपसभापती कैलास चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ''सुरेशदादा जैन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बाजार समितीत कार्य करीत आहोत. समितीवर सत्ता आली त्यावेळी सभापतीपद एक एक वर्षे विभागून घेण्याचे दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या बैठकित ठरले होते. मात्र तब्बल दोन वर्षे झाल्यानंतरही सभापतींनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे अखेर आम्ही अविश्‍वास ठराव दाखल केला आहे.'' यात भाजपचेही दोन सदस्य फोडल्याचा दावा त्यांनी केला आहे.

बाजार समितीतील अविश्‍वास ठराव दाखल करण्याच्या माध्यमातून जैन राजकारणात सक्रीय झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ होण्याची शक्‍यता आहे.

संबंधित लेख