अधिवेशन संपताच इम्तियाज जलील तेलंगणात प्रचारासाठी रवाना

 अधिवेशन संपताच इम्तियाज जलील तेलंगणात प्रचारासाठी रवाना

औरंगाबाद : मध्य विधानभा मतदारसंघातील एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील विधीमंडळाचे अधिवेशन संपताच आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी तेलंगणात दाखल झाले आहेत. एमआयएमचे नेते ओवेसी बंधू यांनी तेलंगणा राज्याच्या निवडणुकीत स्वतःला झोकून देत चांगलाच जोर लावला आहे. महाराष्ट्रात विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे इम्तियाज जलील यांना तिकडे प्रचारासाठी जाता आले नव्हते. पण अधिवेशन संपताच दुसऱ्या दिवशी जलील यांनी तेलंगणा गाठत आपल्या नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचाराची धुरा सांभाळली. 

वंचित बहुजन आघाडी व एमआयएम एकत्रित आल्यापासून इम्तियाज जलील हे पक्षाचे महाराष्ट्रातील फायरब्रॅन्ड नेते म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. दोन ऑक्‍टोबर रोजी औरंगाबादेत झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त सभेत त्यांनी जोरदार भाषण करत उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या होत्या. दरम्यान तेलंगाणा राज्यातील विधानसभा निवडणुका घोषित झाल्या आणि एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांना महाराष्ट्रात येता आले नाही. त्यांच्या अनुपस्थितीत इम्तियाज जलील व पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वंचित आघाडीच्या शहरातील कॉर्नर सभा, बैठका चांगल्याच गाजवल्या. 

एवढेच नाही तर ओवेसी यांची उणीव भासू न देण्याची काळजी देखील इम्तियाज जलील यांनी आपल्या खांद्यावर घेतली. पुण्यात नुकत्याच झालेल्या वंचित बहुजन आघाडी-एमआयएमच्या रेकॉर्डब्रेक सभेत देखील इम्तियाज यांनी तडाखेबंद भाषण करत ओवेसी यांची कमतरता भरून काढली होती. त्यांच्या या वक्तृत्व शैलीमुळेच ओवेसी बंधूंनी त्यांना तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला देखील आर्वजून बोलावले होते. 

सुरूवातीला इम्तियाज जलील यांच्यासह शहरातील काही नगरसेवक, पदाधिकारी तेलंगणा प्रचाराला गेले होते. पण मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणा सारखा महत्वाचा विषय महाराष्ट्राच्या विधीमंडळ अधिवेशनात चर्चेला येणार असल्यामुळे इम्तियाज यांना तेलंगाणा दौरा अर्धवट सोडून परतावे लागले होते. विधानसभेत देखील मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा जोरकसपणे मांडत एमआयएमने कोर्टात धाव घेतली. उच्च न्यायालयाने मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण देण्याचे निर्देश दिलेले असतांना ते दिले जात नसल्याचा घणाघाती आरोप करत त्यांनी सभागृह दणाणून सोडले होते. 

महाराष्ट्रातील एमआयएमचे दोन आमदार इम्तियाज जलील व वारीस पठाण हे दोघे सभागृहात मुस्लिम आरक्षणाची मागणी लावून धरत होते. तेव्हा राज्यातील एमआयएमचे इतर नेते व पदाधिकारी तेलंगणाच्या प्रचारात जुंपले होते. 


विधानसभेच्या अधिवेशनाचे शनिवारी सुप वाजताच इम्तियाज जलील यांनी पहिल्या विमानाने हैद्राबाद गाठले आणि तेलंगणा राज्यातील निवडणुक प्रचारात स्वताला झोकून दिले. असदुद्दीन, अकबरोद्दीन या ओवेसी बंधु सोबत औरंगाबादमधून डॉ. गफ्फार कादरी, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते फिरोज खान यांच्यासह काही नगरसेवक आणि पदाधिकारी प्रचारासाठी फिरत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com