नवीन शहर वसवून त्याचे नाव "खैरेनगर' ठेवा - इम्तियाज जलील

नवीन शहर वसवून त्याचे नाव "खैरेनगर' ठेवा - इम्तियाज जलील

औरंगाबाद : गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्याचे शहर अशी ओळख झालेल्या शहराला संभाजी महाराजांसारख्या लढवय्या राजाचे नाव देवून त्यांचा अपमान करू नका. यापेक्षा आपल्या राजकीय कारकीर्दीत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी जर काही सांगण्यासारखी विकासकामे केली असतील तर ती जाहीरपणे सांगावी. शहराचे नावच बदलायचे असेल तर त्यांनी एखादे नवीन शहर निर्माण करावे, लोकांना सोबत घेऊन त्या शहराचे नाव " खैरेनगर ' करा असा ठराव आम्ही मांडू अशा शब्दांत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करा या शिवसेना खासदार खैरे यांच्या मागणीची खिल्ली उडवली. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलहाबादचे नामांतर करून ते प्रयागराज केले. त्यानंतर औरंगाबाद, उस्मानाबाद आणि आता पुणे शहराचे नाव बदलण्याची मागणी पुढे आले आहे. गेल्या महिन्यात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शहरात झालेल्या शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात खासदार खैरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करा अशी मागणी करत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली होती. नामांतराचा हा मुद्दा पेट घेत असतांनाच एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी सरकारनामाशी बोलतांना शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर थेट हल्ला चढवला. ते म्हणाले, मी कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हापासून शहराच्या नामांतराचा विषय ऐकत आलो आहे. निवडणुका आल्या की हा मुद्दा उपस्थित केला जातो, शिवसेनेला राम आठवतो. मुळात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे विकासासंदर्भात सांगण्यासारखे काहीच नाही, म्हणून ते या विषयावरून राजकारण करतात. गेल्या पंधरा-वीस वर्षापासून खैरेचे राजकारणच त्यावर सुरू आहे. 

खैरेंना मत देणाऱ्यांचाही विरोध 
शहराचे नाव बदलून काही साध्य होणार नाही हे सुजाण जनता ओळखून आहे. त्यामुळे निवडणुकीत खैरे यांना मत देणारे लोक देखील खाजगीत "त्यांच्याकडे चांगले काम दाखवण्या सारखे किंवा सांगण्यासारखे काहीच नाही, म्हणून ते औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा मुद्दा उकरून काढतात' असे बोलतात. लोकांचा अशा गोष्टींना अजिबात पाठिंबा नाही असा दावा देखील इम्तियाज जलील यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने देखील नाव बदलण्याच्या याचिके संदर्भातील आपल्या निरीक्षणांमध्ये नवे शहर वसवून त्याचे नाव बदला असे मत नोंदवले होते. त्यामुळे सत्तेच्या जोरावर शहराचे नाव बदलण्याचा प्रयत्न केला गेला, तर औरंगाबादकरांना सोबत घेऊन कायदेशीर लढा देऊ असा इशारा देखील इम्तियाज यांनी दिला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com