Jalgav : Bjp sends posters of Deendayal to Garbage seller | Sarkarnama

जळगाव : भाजपतील "धन्नाशेठ'च्या गर्दीत  "दीनदयाळ' हरवले रद्दीत ! 

कैलास शिंदे : सरकानामा ब्युरो 
सोमवार, 3 जुलै 2017

शिस्तप्रिय म्हणून ओळख असलेल्या पक्षात असा प्रकार कसा झाला याचे गांभीर्य वाटत आहे. इतर पक्षातून भाजपकडे येण्याचा नेत्यांचा ओढा वाढला आहे. पक्ष वाढत असतांना प्रचार पत्रके वाटण्यासाठी भाजपला कार्यकर्त्यांची वानवा निर्माण झाली ?  बाहेरून आलेले "मालदार' नेते मोठ्या पदावर गेले. केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षात सर्वच "नायक' झाले. कार्यकर्ता मात्र तेथेच राहिला. त्यातून "नेता' आणि कार्यकर्ता अशी दरी निर्माण झाली. धन्नाशेठ नेत्यांच्या या गर्दीच मात्र "दीनदयाळ' यांना रद्दीत हरविण्याची वेळ आली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र जळगाव भाजप कार्यालयातील या प्रकाराबाबत जिल्ह्यात पक्षात असंतोष धुमसत असतांना प्रदेशस्तरावरील नेते मात्र गप्प आहेत. 

जळगाव : जनसंघाचे संस्थापक पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने त्यांच्या कामाची जनतेला माहिती व्हावी तसेच केंद्रात असलेल्या भाजप सरकारच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या कामाची जनतेला माहिती व्हावी यासाठी तयार केलेले प्रचार साहित्य देशभरातील भाजप कार्यालयात पाठविण्यात आले. 

जळगाव जिल्ह्यातही तीन टन साहित्य दाखल झाले. मात्र जनतेत न वाटता ते साहित्य थेट रद्दीत विकण्यात आल्याचे उघडकीस आले असून त्यावरून पक्षात गदारोळ सुरू झाला आहे.

 प्रचार पत्रकावर पंडित दीनदयाळ उपाध्याय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे छायाचित्रही आहे. तब्बल तीन टन प्रचार साहित्य जळगाव जिल्हयात पाठविण्यात आले होते. भाजप कार्यालयात साहित्याचे हे खोके प्रत्येक नेत्यांच्या नावानिशी वितरण करण्यासाठी आले होते. मात्र तब्बल महिनाभरापासून भाजप कार्यालयातून हे सामान वितरीत न होता, तसेच पडून होते. 

अचानक एक जुलैला जळगावातील "एमआयडीसी'तील रद्दी विक्रेत्याकडे हे साहित्य रद्दीत विकले गेल्याचे उघडकीस आले. या संपूर्ण रद्दीचे 30 हजार रूपये आल्याचे सांगण्यात आले. यामुळे जळगावात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पक्षाच्या जिल्हांध्यक्षांनी थेट कार्यालयमंत्री अमित चौधरी यांच्यावर ठपका ठेवत त्यांना पदच्युत केले आहे.

मात्र या प्रकरणी भाजप कार्यकर्त्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पक्षाच्या कार्यालयात हे साहित्य महिनाभर कसे पडून होते? वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ते साहित्य कार्यालयमंत्री परस्पर कसा विकू शकतो? असा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. 

कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यात "भाजप'ने आपले चांगलेच वर्चस्व निर्माण केले आहे. दोन खासदार, नऊ आमदार, जिल्हा परिषदेवर सत्ता, अकरा पालिकांवर पक्षाच्या नगराध्यक्षपदाचा झेंडा अशी सत्तेची श्रीमंती पक्षाला आली आहे. त्यामुळे राज्यात ज्याप्रमाणे पक्षात इतर पक्षातून "इनकमिंग'चा ओढा सुरू आहे, तसाच जिल्ह्यातही आहे. जिल्ह्यात कॉंग्रेस अत्यंत कमजोर आहे, तर राष्ट्रवादीचा विरोध जोरदार नाही त्यामुळे विरोधकांचे मोठे आव्हानही नाही. 

त्यामुळे जिल्ह्यात पदाधिकारीही हवेत आहेत. तर कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर आहेत. त्यामुळे पक्षाच्या कार्यक्रमाकडेही आता पाठ फिरविली जात असल्याचे चित्र दिसत आहे. "संघा'च्या मुशीत तयार झालेल्या पक्षात एकेकाळी कार्यकर्त्यांची फळी होती, त्याच बळावर पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून कोणताही "आदेश' आला मोजके कार्यकर्ते असतानाही तो कार्यक्रम यशस्वीपणे राबविला जात असे . अगदी प्रचार साहित्य कार्यकर्ते झेरॉक्‍स करून वाटत होते. परंतु आज केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या या पक्षाला केंद्रकडून आलेले साहित्य वाटायला कार्यकर्ते नसल्याचे दिसत आहे. 

"कार्यकर्त्यांच्या'बळावर जळगाव जिल्ह्यात भाजप वाढला आहे. अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने कार्यक्रम राबविणाऱ्या या पक्षात आपल्याचे नेत्यांचे साहित्य रद्दीत विकण्याची वेळ यावी? याची कार्यकर्त्यामधून शोकांतिका व्यक्त होत आहे. भाजपकडे एकेकाळी केवळ दोन आमदार होते. त्यावेळी पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी मावत नव्हती, आता मात्र केंद्रात व राज्यात सत्ता असणाऱ्या भाजपला प्रचार साहित्य वाटपासाठी कार्यकर्ते मिळू नयेत याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. तब्बल महिनाभर हे साहित्य उघड्यावरच कार्यालयात पडून होते. ते वाटलेच गेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

 

विशेष म्हणजे पदाधिकारीच लक्ष देत नसल्यामुळे कार्यकर्तेच ते घेऊन जाण्यास उत्सुक नसल्याचे दिसून आले. त्यामुळे अखेर ते रद्दीत गेल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षात प्रवेश करण्यासाठी आजही अनेकांची रिघ लागली आहे. अशा स्थितीत ही परिस्थिती का आली, याबाबत चर्चा सुरू आहे. पक्षात "इनकमिगं'चा ओढा सुरू असतांना कार्यकर्ता पक्षापासून दूर गेला काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

 

या गदारोळात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली भावना निश्‍चितच बोलकी आहे. "पक्षाशी संबध नसलेल्या "धनवान' लोकांना पक्षात आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांची पदे मिळतात. आमचा कधीही विचार केला जात नाही. पक्ष वाढविण्यासाठी बाहेरचे निश्‍चित घ्यावे पण कार्यकर्ता म्हणून आमचे काय? याचा विचार कुणीच करीत नाही. आम्ही सत्ता नसतानाही प्रचार पत्रके वाटली, सत्ता असतांना त्याची फळे बाहेरच्यांनी खावी आम्ही मात्र प्रचार पत्रकेच वाटावी काय?' असाही त्यांचा सवाल आहे. पक्षात प्रवेश करून सत्ता भोगणाऱ्या या नेत्यांवर प्रचार पत्रकांची जबाबदारी का नाही? त्यांनी किती पत्रके कार्यालयातून नेली याचाही हिशेब घ्यावा अशी मागणीही कार्यकर्त्यांकडून होत आहेत. 

कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्यात दरी निर्माण झाल्याने भाजपत आज प्रचारसाहित्य वाटपासाठी कार्यकर्ता धजावला नाही, असे चित्र दिसत आहे. परंतु दुसरीकडे वर्षभर असलेल्या कार्यक्रमाचे हे साहित्य चक्क रद्दीत जावे हे सुध्दा दुर्दैवच आहे. भाजपचा मूळ कार्यकर्ता ते कधीही सहन करणार नाही, त्यामुळे तो संतापला आहे. याची चौकशी करून संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही कार्यकर्ते करीत आहेत. मात्र, पक्षात मूळ कार्यकर्त्यांऐवजी "धन्नाशेठ'ची गर्दीत अशीच वाढत राहिल्यास "दीनदयाळ' जनतेत नव्हे तर रद्दीतच हरवतील एवढे मात्र निश्‍चित. पक्षाचे प्रदेशस्तरावरील नेते साहित्य रद्दीत गेल्याप्रकरणी काय निर्णय घेणार, याची आता कार्यंकर्त्यांनाही प्रतीक्षा आहे. 

संबंधित लेख